Shashan Aaplya Dari: उद्या साताऱ्यातून 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ; सर्वसामान्यांची कामे होणार त्वरित, मिळणार विविध योजनांचे लाभ

या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे.

CM Eknath Shinde | Twitter/CMO

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ (Shashan Aaplya Dari) हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (13 मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.

राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Govt Drops Charges Against Param Bir Singh: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत निलंबन केलं रद्द)

या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे. हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. पहिल्यांदाच सर्व प्रशासन “हर घर दस्तक” च्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती देणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे.