Sharad Pawar on Central Government: 'निवडणुकांच्या तोंडावर उशिरा का होईना, शहाणपण आलं'; कृषी कायदे मागे घेतल्यावरुन शरद पवार यांचा मोदी सरकारला टोला
अखेर सरकारला उशीरा का होईना शहाणपण आले, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बहुमताच्या जोरावर संसदेत मंजूर करुन घेतलेले कृषी कायदे (Farm Laws Repeal) केंद्र सरकारने परत घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तशी घोषणा केली. सुरुवातीपासूनच टीकाचा विषय ठकरलेले हे कायदे परत घेतल्यानंतरही टीकेचाच विषय ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आगामी काळात विविध राज्यांमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अखेर सरकारला उशीरा का होईना शहाणपण आले, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी म्हटले की, पुढच्याच वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश आणि इतरही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये सरकारबद्दल असलेल्या जनप्रक्षोभाचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पाठीमागील वर्षभरापासून देशभरातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. उन, वारा, पाऊस आणि थंडी झेलत आहेत. कशाचीही तमा न बाळगता या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सरकारने प्रयत्न केला. पण, शेवटी सरकारला झुकावे लागले. कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकऱ्यांच्या संघर्षाला आपण सलाम करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांचे कौतुक केले. (हेही वाचा, Farm Laws Repeal: आंदोलनजीवी ते परजीवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कृषी कायदे मागे घेण्यापर्यंतचा भाषण प्रवास (Video))
ट्विट
शरद पवार पुढे म्हणाले, मी स्वतः 10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होतो. राज्याचा विषय असलेल्या शेतीच्या प्रश्नावर मी नेहमी वचनबद्धता ठेवली होती की, सर्व संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय, शेतीविषयक कायद्यांशी संबंधित कोणतेही नवीन उपाय करणे योग्य नाही. मी स्वतः सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांकडून सल्ला मागितला होता. परंतु या सरकारने चर्चा न करता तीन कृषी कायदे लागू केले, असेही पवार म्हणाले.