Sharad Pawar on Devendra Fadnavis' Allegations: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले- 'कितीही प्रयत्न करा सरकार कार्यकाळ पूर्ण करेल'
125 तासांचे रेकॉर्डिंग करणे म्हणजे या प्रक्रियेला किती तास लागले याचा विचार करता ही कौतुकास्पद गोष्ट आहे
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या विरोधात विशेष सरकारी वकिलांनी रचलेल्या कटाचे 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टाकला. यामध्ये राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor), विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय असे रेकॉर्डिंग शक्य होणार नाही. राज्यात असे रेकॉर्डिंग करणे शक्य आहे की नाही हे सिद्ध झाले पाहिजे. तसेच फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची राज्य सरकारने चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय तपास यंत्रणा तैनात करूनही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात फडणवीसांना यश येत नसल्याने, त्यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचे पवार म्हणाले. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘सरकारी अधिकाऱ्यांकडे 125 तासांचे रेकॉर्ड आहे हे कौतुकास्पद आहे. केंद्रीय तपास यंत्रणेशिवाय हे अशक्य आहे. अनिल देशमुख यांच्यावर 90 छापे टाकण्यात आले आणि सत्तेचा गैरवापर करून चौकशी करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मला या आरोपांबाबत खोलात शिरायचे नाही, परंतु राज्य सरकारने याची चौकशी केली पाहिजे. यामध्ये माझ्या नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे पण मला त्याच्याशी देणेघेणे नाही. रेकॉर्डिंगची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे.’
शरद पवार म्हणाले, ‘फडणवीस किंवा त्यांचे सहकारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन 125 तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यशस्वी ठरले याबद्दल मी खुश आहे. 125 तासांचे रेकॉर्डिंग करणे म्हणजे या प्रक्रियेला किती तास लागले याचा विचार करता ही कौतुकास्पद गोष्ट आहे. जर 125 तासांचे रेकॉर्डिंगचे काम खरोखर केले असेल तर यासाठी एक शक्तिशाली एजन्सी वापरली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी फक्त भारत सरकारकडे आहेत.’ (हेही वाचा: पाच-सहा वर्षांपासून सरकारी नोकऱ्या का भरल्या नाहीत? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल)
पुढे, सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजपच्या मागणीवर पवार यांनी स्पष्ट केले की, मलिक मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मुस्लिम कार्यकर्त्याचे नाव दाऊदशी जोडणे घृणास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले.