Prakash Ambedkar On Sharad Pawar: 'शरद पवार दुबईत दाऊद इब्राहिमला भेटले होते'; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य
तथापी, आपण आरोप करत नसून काही तथ्य समोर ठेवत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Prakash Ambedkar On Sharad Pawar: वंचित बहुजन आघाडी (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) मोठा आरोप केला आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई (Dubai) मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) ला भेटले होते, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तथापी, आपण आरोप करत नसून काही तथ्य समोर ठेवत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मी कोणतेही आरोप केले नसून फक्त काही तथ्य समोर ठेवले आहेत. शरद पवार 1988-1991 दरम्यान मुख्यमंत्री होते. त्यादरम्यान शरद पवार लंडनला गेले आणि त्यानंतर बैठकीसाठी ते कॅलिफोर्नियाला गेले. पवार लंडनला परत आले आणि नंतर दुबईला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी दुबईत दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती. दाऊतसोबतच्या बैठकीला केंद्र सरकारने मान्यता दिली होती का?' असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. (हेही वाचा -Prakash Ambedkar: "पण आपल्यालाल लढावं लागणार..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार)
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटलं आहे की, केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का ? तसेच शरद पवार यांना केंद्र सरकारने दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगीही दिली होती का? आणि दाऊद आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला होता का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत. (हेही वाचा -Ajit Pawar यांनी Prakash Ambedkar यांच्यासोबत जावं; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा सल्ला)
शरद पवार दुबईत दाऊद इब्राहिमला भेटले - प्रकाश आंबेडकर
यात कोणत्याही एका पक्षाचा संबंध आहे, असे मी म्हणत नाही. मात्र यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची माहिती राज्य व केंद्र सरकारने द्यावी. बाबा सिद्दीकी यांची हत्या ही एक सुरुवात आहे. सध्याची परिस्थिती 1990-2000 मध्ये होती तशीच आहे. ही परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी निवडणुकीच्या वेळी ही बाब मतदारांना समजावी, यासाठी आवाज उठवला जात आहे. 1990 मध्ये जी परिस्थिती दिसली होती तीच पुन्हा दिसून येत आहे. याचे कारण काहीही असले तरी केंद्र सरकारने ते शोधले पाहिजे. मी फक्त कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत नाही तर देशाच्या सुरक्षेबद्दल बोलतो आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.