पुण्यात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद राहणार; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

अत्यावश्यक सेवा, शिफ्ट मध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंदचं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, शिफ्ट मध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार असल्याचा इशारादेखील मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. (वाचा - COVID19 in Mumbai: मुंबईत लोकलमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ? पहा BMC ची आकडेवारी)

दरम्यान, पुणे शहरात शनिवारी नव्याने 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 1 हजार 928 इतकी झाली आहे. तसेच पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत मृतांची एकूण संख्या 4 हजार 853 इतकी झाली आहे.