Schools Reopen in Maharashtra: राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावे लागणार 'या' नियमांचे पालन
ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न पालकवर्गांसह अनेकांना पडला होता.
कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा (Schools) आणि महाविद्यालये गेले अनेक महिन्यांपासून बंदच आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न पालकवर्गांसह अनेकांना पडला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करून 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दुपारी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शहरात इयत्ता आठवीपासून 12 पर्यंतचे वर्ग येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु होत असल्याची माहिती दिली. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह पालकांना नेमकी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. या संबंधित राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र सरकार कडून महिला पोलिस कर्मचार्यांच्या कामाच्या तासामध्ये कपात, 12 वरून 8 तासांची ड्युटी; Maharashtra DGP Sanjay Pandey यांची माहिती
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांसाठी नियम-
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणे, शक्य असल्यास शाळा दिवसाआड उघडणे.
- विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी परतल्यानंतर ताबडतोब गणवेश धुवायला टाकणे आणि अंघोळ करणे गरजेचे आहे.
- शाळांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- विद्यार्थ्यांसाठी आयसोलेशन सेंटरची निर्मिती करावी. तसेच स्थानिक डॉक्टरांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून घ्यावेत.
महत्वाचे म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर आहेत, त्यांनी आपल्या मुलांच्या तसेच जवळच्या शाळांमध्ये सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करावा, असेही या नियमावलीत सांगण्यात आले आहे.