पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास आजपासून सुरुवात; तीन टप्प्यात पूर्ण करणार पूल पाडण्याचे काम
पुण्यात आजपासून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पूल पाडण्याचे निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे.
पुण्यातील (Pune) सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील (Savitribai Phule University Chowk) पूल पाडण्यास आजपासून (14 जुलै) सुरुवात झाली आहे. पुण्यात आजपासून कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. त्यामुळे पूल पाडण्याचे काम अधिक सोपे होईल. त्यामुळेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने आजपासून पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पीएमआरडीने (PMRD) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पात हिंजवडी (Hinjewadi) ते शिवाजीनगर (ShivajiNagar) मधील हा पूल अडथळा बनला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतर आज मंगळवार, 14 जुलै पासून पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (शिवाजीनगर परिसरामध्ये वाहतूक कोंडी; पुणे लॉकडाऊन दरम्यान वाहनांची कसून तपासणी)
पुणे महानगरपालिकेच्या असलेला हा पूल पाडण्यापूर्वी पीएमआरडीला पुणे महापालिकेकडून एनओसी देण्यात आली होती. तसंच हा पूल तीन टप्प्यात पाडण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात चतुर्श्रुंगी येथील, दुसऱ्या टप्प्यात बाणेरच्या दिशेने जाणारा तर शेवटच्या टप्प्यात औंधच्या दिशेने जाणारा पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला आहे.
पूल पाडण्याचे तीन टप्पे:
पहिला टप्पा- चतुर्श्रुंगी
दुसरा टप्पा- बाणेरच्या दिशेने जाणारा
तिसरा टप्पा- औंधच्या दिशेने जाणारा
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे पुढील दहा दिवस शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहारातील प्रत्येक चौकात नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान विकासकामं सुरु ठेवण्यात आली आहेत. आजपासून सुरु झालेला लॉकडाऊन 23 जुलै पर्यंत असणार आहे. 14 ते 18 जुलै आणि 19 ते 23 जुलै असे लॉकडाऊनचे दोन टप्पे असणार आहेत.