सांगली: कवठे महांकाळ पंचायत समिती माजी सभापती मनोहर पाटील यांची हत्या, एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांचा खून
आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होत. त्यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्रांनी खून केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेते आणि कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील (Manohar Patil) यांचा खून झाला आहे. चार दिवसांपूर्वीच आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता मनोहर पाटील यांची हत्या (Manohar Patil Murder) करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे सांगली (Sangli) जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. प्रामुख्याने एकाच पक्षाच्या तालुका पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या नेत्यांच्या हत्या झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मनोहर पाटील यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्रांनी वार केले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेत मनोहर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मनोहर पाटील यांच्या हारोली येथील शेतात घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, पुढील तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, सांगली: धारधार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांचा मृत्यू)
दरम्यान, मनोहर पाटील यांच्या हत्येपूर्वी चारच दिवस आगोदर (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होत. त्यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्रांनी खून केला होता.
पलूस तालुक्यात असलेल्या खटाव गावाजवळ असलेल्या ब्रह्मनाळ गाव हद्दीत आनंदराव पाटील याचे शेत आहे. शेतात असलेले काम अटोपून परतत असललेल्या पाटील यांच्यावर दुपारी बारा वाजता हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोर हे पाटील यांच्या परतन्याची वाट पाहात रस्त्यात दबा धरुन बसले होते.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या आले होते. उपचारादरम्यानत त्याचा मृत्यू झाला.