Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला
सांगलीची जागा काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि त्या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी जाहीर करेन अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.
महाविकासआघाडीच्या जागापाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (UBT) पक्षास सुटल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सांगलीची जागा काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि त्या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी जाहीर करेन अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. संगलीची जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही जोर लावला होता. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्टींनी कोणतीही दखल घेतली गेली नाही परिणामी काँग्रेसला जागा मिळाली नाहीच. पण विशाल पाटील यांची उमेदवारीही धोक्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी असहकाराचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा पहिला परिपाक मिरज तालुका काँग्रेस कमिटी बर्खास्त करण्याच्या ठरावात झाला.
सांगलीच्या जागावेरुन मविआमध्ये बरीच नाराजी आहे. त्यातच सांगलीमध्ये समेट घडण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाही. परिणामी मविआच्या उमेदवाराचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या सांगली येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांंनी आक्रमक भूमिका व्यक्त केली. दरम्यान, विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयात सांगली येथे तोडफोड केल्याचेही वृत्त आहे. (हेही वाचा, Vishal Patil: उमेदवारीतून पत्ता कट होताच विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक; सांगली येथील काँग्रेस कार्यालयात तोडफोड)
विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा लढण्यासाठी जोरदार तयारी केली होती. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी काँग्रेस ऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपच्या संजय काका पाटील यांनी त्यांचा पराभव केला. या वेळीही विशाल पाटील लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसला जागाच न मिळाल्याने पाटील यांना धक्का बसला. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाने दबावाचे राजकारण करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जागापाटपाआधीच जाहीर केली आणि ती कायम ठेवली. त्याचा मोठा फटका विशाल पाटील यांना बसला. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेत नाराजी, अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर; राजीनामासत्र सुरुच)
दरम्यान, सांगलीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु झाले असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा गट संपवीण्याचे काम सुरु असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे. दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये भाजपने संजय काका यांच्यावरच पुन्हा एकदा डाव लावला आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने प्रकाश शेंडगे मैदानात आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी पक्षानेही उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीचा गुंता महाविकासआघाडी कसा सोडवते याबाबत उत्सुकता आहे.