IPL Auction 2025 Live

Guardian Minister of Sambhajinagar: संदिपान भुमरे यांचा राजीनामा, अब्दुल सत्तार संभाजीनगरचे नवे पालकमंत्री

या जिल्ह्याच्या पालमंत्रिपदाची सूत्रे आता मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Sandipan Bhumre, Abdul Sattar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्हा पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्ह्याच्या पालमंत्रिपदाची सूत्रे आता मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भुमरे हे विधानसभेवरील आमदार होते. आमदार असतानाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. निवडूण आल्याने ते खासदार झाले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सहाजिकच त्यांना पालकमंत्री पदावरुन बाजूला व्हावे लागणार होते. दरम्यान, उत्सुकता हिच होती की, भुमरे यांच्यानंतर हे पद कोणाकडे सोपवले जाते.

संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत

संभाजीनगर लोकसभा निवडणूक चुरचीशी झाली. या ठिकाणी तत्कालीन खासदार इम्तियाज जलील, प्रदीर्घ काळ खासदार राहिलेले शिवसेना (UBT) पक्षाचे चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत भुमरे यांनी बाजी मारली. ते निवडूण आले. खासदार म्हणून निवडून आले तरी, भुमरे यांनी अद्यापही पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता. मात्र, नियम आणि कायदेशीर संकेतांना अनुसरुन त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे

संभाजीनगर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आता अब्दुल सत्तार असणार आहेत. सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचेही पालकमंत्री पद आहे. आगामी विधानसभा तोंडावर आल्याने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यावर मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विश्वासू समजल्या जाणाऱ्या सत्तार यांच्याकडे हे पद दिल्याची चर्चा आहे.

कोणत्या आमदारांनी दिला राजीनामा?

लोकसभा लढविण्यासाठी किंवा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले आमदार पुढीलप्रमाणे: वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, रवींद्र वायकर, प्रतिभा धानोरकर, संदिपान भूमरे, निलेश लंके,राजू पारवे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे बंड झाले. अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रुपात एक गट वेगळा झाला आणि त्यांनी मूळ पक्षावरच दावा ठोकला. निवडणूक आयोगानेही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले. या पार्श्वभूमीवर राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा सपशेल पराभव झाला. भारतीय जनता पक्षाला तर केवळ नऊ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती कोणत्या पद्धतीने रणनिती आखते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबत महाविकासआघाडीच्या धोरणांवरही सर्वांचे लक्ष आहे.