Sameer Wankhede Corruption Case: समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप
तिथून त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले होते.
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) शुक्रवारी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा (Corruption Case) दाखल केला. समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणामुळे वानखेडे प्रकाशझोतात आले होते. चार आठवडे तुरुंगात घालवल्यानंतर आर्यनला ‘पुरेशा पुराव्याअभावी’ मे 2022 मध्ये अंमली पदार्थ विरोधी एजन्सीने सर्व आरोपातून मुक्त केले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, सीबीआयने समीर वानखेडेवर आर्यन खानला ड्रग्ज बस्ट प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. कोडिला क्रूझ आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी 25 कोटींची मागणी केली आणि 50 लाख खंडणी म्हणून घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे यांच्या मुंबईतील अंधेरी येथील घरावरही सीबीआय छापा टाकत आहे. सध्या, केंद्रीय एजन्सी दिल्ली, मुंबई, रांची आणि कानपूरमधील इतर 28 ठिकाणी छापे टाकत आहे. दक्षता अहवालाच्या आधारे सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर वानखेडे आणि तीन लोकसेवकांविरुद्ध हा भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षता चौकशीत वानखेडे यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मालमत्ता जमवल्याचे उघड झाले. (हेही वाचा: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत निलंबन केलं रद्द)
वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय प्रमुख होते जेव्हा त्यांनी आणि इतरांनी 2021 मध्ये शहराच्या किनारपट्टीवर एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. तिथून त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले होते. त्यावेळी एनसीबीने समीर वानखेडेविरुद्ध आर्यन खान प्रकरणाची दक्षता चौकशी केली होती, ज्याचा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.