'रासप'कडून 5 मार्चला मुंबई येथे महामेळ्याचे आयोजन; लोकसभेच्या 5 जागांची मागणी
येत्या 5 मार्चला पक्षाच्या वतीने मुंबई, दादरच्या शिवाजी पार्क येथे महामेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली
राष्ट्रीय समाज पक्षा (RSP) चे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये येत्या 5 मार्चला पक्षाच्या वतीने मुंबई, दादरच्या शिवाजी पार्क येथे महामेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळ्यात पक्षाकडून काही मागण्या मांडल्या जाणार आहेत, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात ही महत्वाची मागणी असणार आहे. या महामेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.
महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाबरोबरच मुस्लिम आरक्षणप्रश्नी अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजूनतरी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता रासपच्या मागणीनंतर तरी सरकार काय हालचाल करेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पक्षाच्या इतर मागण्या –
धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून त्याची अंमलबजावणी करावी
महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे
ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षणाची फेररचना करावी
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे.