सोनिया गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर रोहित पवार यांचे नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोरोना व्हायरस संकटकाळात राज्य सरकारच्या योजनांबद्दल काही तक्रारी केल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना प्रत्त्युतर दिले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोरोना व्हायरस संकटकाळात राज्य सरकारच्या योजनांबद्दल काही तक्रारी केल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नामोल्लेख टाळत फडणवीसांना प्रत्त्युतर दिले आहे. "महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य यंत्रणेसह इतर सर्व यंत्रणा जीवतोड मेहनत करत असताना त्यांच्या कष्टावर राजकीय हेतूने कुणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही," असं म्हणत त्यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याची लिंक त्यांनी ट्विटरद्वारे देखील शेअर केली आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "भाजपच्या एका प्रमुख नेत्याने सोनिया गांधी यांना लिहिल्या पत्रात राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांबाबत काही आक्षेपार्ह मुद्दे निदर्शनास आले. त्यामुळे वस्तुस्थिती समोर यावी म्हणून मी लिहितोय. विरोधासाठी विरोध करणं चुकीचं आहे, त्याने लोकांचा काही फायदा होत नसतो, अशी शिकवण लहानपणापासून मला आहे. त्यामुळं असा विरोध कुणी करत असेल तर तेही लोकांसमोर आलं पाहिजे. तसंच या पोस्टमधून कुणावर टीका करणं हाही माझा हेतू नाही, हे ही त्यांनी स्पष्ट केलं."
पुढे ते लिहितात, "मे महिन्यातील 13 तारखेचा दाखला देत महाराष्ट्रामध्ये एकूण संक्रमणाच्या 22 टक्के संक्रमण असल्याचा दावा करण्यात आला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अधिक असल्याने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीपासूनच रुग्ण संख्या अधिक होती. आजही सक्रिय रुग्णांची संख्या पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या महानगरात अधिक आहे. इतर राज्यांमध्ये चाचण्या कमी होत असल्याने स्वाभाविकच रुग्ण संख्याही कमी दिसते. मात्र आपल्या राज्याने आधीपासूनच टेस्टिंग आणि ट्रेसिंग वर भर दिल्याने रुग्ण संख्या जास्त दिसते. या परिस्थितीत केंद्राने मदत केली नाहीच पण आर्थिक नुकसानीची भरपाई, रेमडीसीवर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनमध्येही खूप चांगला न्याय दिला, असं नाही. त्याचबरोबर जिनोम सिक्वेन्सिंग च्या संशोधनात ही केंद्राकडून विलंब झाला.
पत्रात केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्व मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. पण मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता लस वाटपापर्यंत महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच झाला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या राज्यांवरच लसीकरणाचा अधिकचा भार केंद्राने टाकला. पहिल्या लाटेनंतरही केंद्राला निर्णायक धोरण आखायला विलंब लागल्यामुळे पुरेसा वेळ हातात असतांनाही आपली देशाची लसीकरण क्षमता वाढवली नाही. तरीही राज्य शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे. देशातल्या बहुतांश भाजप शासित राज्यांमध्ये खाजगी लॅब्सला कोव्हीड तपासणीसाठी बंधने घालून रुग्णांची संख्या घटवण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला होता, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई पालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आणला आहे याचं त्यांना कौतुक नाही. राज्यात आणि राजधानीत कोरोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आनंददायक नाही का? असा सवालही त्यांनी पोस्टद्वारे विचारला आहे. (ही वेळ राजकारणाची नसून जनतेबरोबर उभे राहण्याची आहे; देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र)
रोहित पवार पुढे म्हणतात, "महाविकास आघाडी सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. सत्य स्वीकारुन दुसरी लाट थोपवण्यासाठी आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आज खरंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीचा पाठपुरावा करणं आवश्यक असतांना आजपर्यंत एकाही नेत्याने ते धारिष्ट्य दाखवल्याचं दिसत नाही पण राज्य संकटात असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी केंद्राच्या PM CARE मध्ये मदत जमा करण्याचं मात्र त्यांनी न विसरता आवाहन केलं."
रोहित पवार ट्विट:
सोनिया जी गांधी यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा दावा केला आहे. यात तथ्य असतं तर या विभागातील प्रमुख शहरं सोडली तर इतर ठिकाणची रुगणसंख्या स्थिरावताना दिसली नसती. उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमधील रुग्ण प्रवास करून महाराष्ट्रात उपचारासाठी येत आहेत. तिथं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुऱ्या पडत असून अनेक मृतदेह गंगा किनारी पुरले जात असल्याचं तर काही नदीत ढकलले जात असल्याचं विदारक चित्र संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहतंय, असंही ते पोस्टमध्ये म्हणाले.
इथले विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली. सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि 'आरबीआय'चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे. परंतु, महाराष्ट्रातील नेते केवळ राजकारणासाठी याकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यात पक्षातले नेते नितीन गडकरी हे 'आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण करू नका,' असा सल्ला देत आहेत. मात्र तरीही चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याची आणि राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही.
राज्यातील अनेक प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत याबाबतही त्यांनी एखादं पत्र केंद्र सरकारला लिहिलं तर राज्यातील जनता निश्चितच त्यांचं स्वागत करेल, असं त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण पोस्टमध्ये रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)