'रितेश देशमुख'ने कर्जमाफी प्रकरणाबाबत सोडले मौन; सरकारकडून 4.7 कोटींचा फायदा घेतल्याचा मधु किश्वर यांनी केला होता आरोप

बदनामी करण्यासाठी किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी कुणीतरी हे मुद्दाम केले आहे, त्यामुळे आपण गैरसमज करून घेऊ नये.’ अशा प्रकारे रितेशने कुटुंबाची बदनामी होत असलेल्या कर्जमाफी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली. अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. मात्र आज सकाळपासून एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची मुले रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा उल्लेख आहे.  प्राध्यापक, लेखल आणि सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या मधु किश्वर (Madhu Kishwar) यांनी हा फोटो ट्विट केला आहे. मात्र त्यावर प्रतिक्रिया देत, आपण किंवा आपल्या भावाने असे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही. बदनामी अथवा जनतेची फसवणूक करण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे कागदपत्रे बनवले असल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने सांगितले आहे.

मधु किश्वर यांनी ट्विट केलेल्या कागदपत्राच्या फोटोमध्ये 2 डिसेंबर अशी तारीख दिसत आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांची नावे असून, या दोघांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कर्जमाफीचा लाभ घेतला असे दिसून येत आहे. यामध्ये या दोघांनी सहकारी सोसायटीशी इकरार करत आपली जमीन गहाण ठेवली असल्याचे नमूद केले आहे. रितेश आणि अमित यांची संयुक्तरीत्या कर्जाची रक्कम ही तब्बल 4 कोटी, 70 लाख, 64 हजार, 105 रुपये इतकी नमूद केली आहे.

रितेश देशमुख ट्विट -

(हेही वाचा: Marjaavaan: रितेश देशमुख आणि धीरज देशमुख या भावंडांमध्ये ट्विटरवर झालेल्या या संभाषणाला तुम्ही Miss करू शकत नाही, दिसेल मराठी संस्कृतीचे उत्तम उदाहरण)

सध्या हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून, त्यानंतर अनेकांनी रितेश व अमित यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आता रितेश देशमुखने ट्विट करत हा सर्व प्रकार चुकीचा असल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये रितेश म्हणतो, ‘मधूजी आपण ट्विट केलेल्या फोटोप्रमाणे मी किंवा माझ्या भावाने असे कोणतेही कर्ज घेतले नाही. बदनामी करण्यासाठी किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी कुणीतरी हे मुद्दाम केले आहे, त्यामुळे आपण गैरसमज करून घेऊ नये.’ अशा प्रकारे रितेशने कुटुंबाची बदनामी होत असलेल्या कर्जमाफी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.