IPL Auction 2025 Live

Restaurant on Wheels: मध्य रेल्वेच्या यशस्वी 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' संकल्पनेचा विस्तार; राज्यातील 'या' ठिकाणी होणार सुरु

पश्‍चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावरून भारतीय रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू केले होते.

Restaurant on Wheels (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य रेल्वेने (Central Railway) काही महिन्यांपूर्वी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ (Restaurant on Wheels) नावाची नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु केली होती. अवघ्या काही दिवसांतच या अभिनव संकल्पनेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व आता ही संकल्पना प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. रेल्वेने यापूर्वी बिगर भाडे महसूल योजनेअंतर्गत अशी दोन उपाहारगृहे उघडली आहेत, एक मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर आणि दुसरे नागपूर स्थानकावर.

आता या रेस्टॉरंटला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन, मध्य रेल्वे आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती स्थानकांवर अशी आणखी चार रेस्टॉरंट्स सुरू करणार आहे व रेल्वेच्या इतर ठिकाणी आणखी सात सुरू करण्याची योजना आहे.

'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' हा एक सुधारित कोच असून जो एका रेस्टॉरंटमध्ये बदलण्यात आला आहे. या कोचमध्ये एकावेळी 40 लोक जेवणाचा आनंद घेऊ शकतील. रेस्टॉरंटचा आतील भाग हा रेल्वे-थीमवर डिझाइन केला गेला आहे. हे रेस्टॉरंट उघडल्यापासून सीएसएमटी स्थानावर अंदाजे 125,000 आणि नागपूर येथे 150,000 लोकांनी त्याला भेट दिली आहे. हे रेस्टॉरंट या परिसरात एक महत्वाचे आकर्षण ठरले आहे. (हेही वाचा: MMRDA कडून मुंबई मेट्रोच्या 2A लाईन वरीन 3 स्थानकांच्या नावांमध्ये बदल)

मध्य रेल्वेचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ हे महसूल निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे. या यशस्वी संकल्पनेचा इतर ठिकाणी विस्तार करण्याच्या योजनांसह, रेल्वे प्रवाशांना जेवणाच्या अनोख्या अनुभवाने आनंद देत राहील याची खात्री आहे. या रेस्टॉरंट्सच्या आगामी ठिकाणांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान यांचा समावेश आहे. दरम्यान, रुळांवर न धावणारे किंवा निरुपयोगी झालेले मेमू ट्रेनचे डबे रुळावरून उतरवून त्यांना नवे रूप देऊन रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केले आहे. पश्‍चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावरून भारतीय रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू केले होते.