The CKP Co-operative Bank: RBI ने रद्द केला सीकेपी बँकेचा परवाना; 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित
अशा प्रकारे आरबीआयने पीएमसी बँकेनंतर आता सीकेपी सहकारी बँकेवरही बंदी घातली आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबई व ठाणे जिल्ह्यात पसरलेल्या 104 वर्ष जुन्या सहकारी बँकेचा, सीकेपी बँकेचा (The CKP Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे. अशा प्रकारे आरबीआयने पीएमसी बँकेनंतर आता सीकेपी सहकारी बँकेवरही बंदी घातली आहे. गुरुवारी उशीरा आरबीआयने बँकेला संदर्भात नोटीस बजावली. परवाना रद्द केल्याने बँकेच्या 11,500 ठेवीदार-गुंतवणूकदार आणि जवळपास 1.25 लाख खातेदारांवर संकट आले आहे. मुंबईतील माटुंगा येथे बँकेचे मुख्य कार्यालय असून मुंबई व ठाणे जिल्ह्यात बँकेच्या एकूण 8 शाखा आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार 2014 मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि नेट वर्थमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती.
आरबीआय ट्विट -
त्यानंतर ही बंदी अनेक वेळा वाढविण्यात आली होती. यावेळी 31 मार्चच्या शेवटी ती वाढवून 31 मे पर्यंत केली गेली होती. परंतु बँकेची स्थिती न सुधारल्यामुळे आरबीआयने त्यापूर्वी कडक पावले उचलली. आरबीआयने बजावलेली संपूर्ण नोटीस पाहण्यासाठी इथे क्लिक करा. बँकेचे नुकसान कमी करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले. गुंतवणूकदार-ठेवीदारांनीही यासाठी प्रयत्न करत, व्याज दरात कपात केली होती. व्याजदर खाली आणून 2 टक्के केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे 485 कोटी रुपयांची एफडीही अडकली आहे. मात्र ठेवीदारांच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असून त्या त्यांना परत मिळणार आहेत. (हेही वाचा: PMC Bank Scam: शरद पवार आणि अनुराग ठाकुर यांच्यात पीएमसी बँक पुनरुज्जीवन करण्याबाबत चर्चा)
यामध्ये काही लोकांनी शेअर्समध्ये त्यांची एफडी गुंतवली होती आणि काही प्रमाणात त्याचे चांगले परिणामही दिसू लागले होते, बँकेचा तोटा कमी होत होता. अशा परिस्थितीत सीकेप बँकेचा परवाना रद्द करून आरबीआयने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. सीकेपी बँकेच्या निव्वळ किमतीत घट झाल्यामुळे त्याचा परवाना रद्द करण्यात आला. 2016 मध्ये बँकेची एकूण नेट वर्थ 230 कोटी रुपये होती, ती आता 146 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.