WHO च्या नव्या गाईडलाईन्स नंतरही पुण्यात कोविड-19 रुग्णांवर Remdesivir औषधाचा वापर सुरुच
दरम्यान, या औषधांचा वापर थांबवण्यासंबंधित राज्य शासनाची कोणतीही सूचना त्यांच्यापर्यंत अद्याप पोहचलेली नाही.
पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये (Pune Hospitals) आजही कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी रेमडिसिव्हर (Remdesivir) औषधाचा वापर केला जात आहे. दरम्यान, या औषधांचा वापर थांबवण्यासंबंधित राज्य शासनाची कोणतीही सूचना अद्याप त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, रेमडिसिव्हर हे कोविड-19 रुग्णांवर तितकेसे परिणामकारक नाही. WHO ने गेल्या आठवड्यात या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यात रेमडिसिव्हर सह चार संभाव्य औषधांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला आहे. यात पॅनलने असे म्हटले आहे की, रेमडिसिव्हर औषधामुळे survival rate वाढल्याचा कोणताही पुरावा हाती आलेला नाही.
परंतु, महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये कोरोना बाधित रुग्णांवर रेमडिसिव्हर औषधाचा वापर सुरु आहे. दरम्यान, WHO कडून जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे विविध खाजगी हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर रेमडिसिव्हर औषधाच्या वापरासंबंधित पेच निर्माण झाला आहे. तसंच रुग्णांचे नातेवाईकही हे औषध न वापरता पर्यायी औषधाचा वापर करण्यास सांगत आहेत. रेमडिसिव्हर हे औषध कोरोनाग्रस्त रुग्णांना 4-5 दिवस दिले जाते. (WHO ची मोठी घोषणा; कोरोनावर देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून Remdesivir बाद)
यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलचे डिन डॉ. राजेंद्र वाबळे यांनी पुणे मिररशी बोलताना सांगितले की, "आम्ही हे औषध हायर अँटीबॉडीजसोबत वापरतो. त्यामुळे उपचार अधिक परिणामकारक होतात. रेमडिसिव्हर औषध दिलेल्या रुग्णांमध्ये चांगली सुधारणा दिसून येते आणि त्यामुळे आम्ही या औषधाचा वापर सुरु ठेवणार आहोत. WHO ने या संदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या असल्या तरी ICMR कडून अद्याप यावर कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत."
कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याचे चिन्ह दिसू लागल्याने महाराष्ट्र शासनाने ठोस पाऊलं उचल्यास सुरुवात केली आहे. तसंच दुसरी लाट टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 3,47,789 वर पोहचली असून त्यापैकी 3,22,638 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7,298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17,820 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.