Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 3,890 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद व 4,161 लोकांना मिळाला डिस्चार्ज; एकूण संक्रमितांची संख्या 1,42,900 वर
काल 1925 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे व कालपर्यंत 69,631 रुग्ण बरे झाले होते. मात्र आज महाराष्ट्रामध्ये तब्बल 4161 एवढ्या विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3,890 कोरोना विषाणू (Coronavirus) बाधीत रुग्णांची व 208 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1,42,900 अशी झाली आहे. राज्यात आता पर्यंत 6739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तब्बल 4161 एवढ्या विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 73,792 इतकी झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज 3530 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
गेले 3 महिने महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. देशात सध्या महाराष्ट्र हे सर्वात प्रभावित राज्य आहे. अशात विरोधी पक्षासह इतरांची नजरही महाराष्ट्रावर आहे. आता इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले असल्याची ही गोष्ट राज्य सरकारची प्रयत्नशीलता दर्शवते. याआधी 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून, त्यानंतर 15 जून रोजी 5071 एवढे रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे. (हेही वाचा: धारावी झोपडपट्टीत आज 10 नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 2199 वर पोहोचली)
सध्या राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 51.64 टक्के एवढा असून, राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. टास्क फोर्सचे (Task Force) प्रमुख डॉ. संजय ओक (Dr Sanjay Oak) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील नवीन प्रकरणांची संख्या, शहरातील डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि मृत्यूचे प्रमाण हे गेल्या तीन आठवड्यांपासून समाधानकारक आहे. मात्र मान्सून, लॉक डाऊनच्या नियमांमधील शिथिलता व संसर्गाचे नवे परिसर ही चिंता अजूनही कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.