Ratnagiri: वन्यप्राण्यांना मारण्यासाठी आणलेले 162 गावठी बॉम्ब जप्त; मध्यप्रदेशातील 40 वर्षीय व्यक्तीला अटक

162 गावठी बॉम्ब दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी जप्त केले आहेत.

Bomb (Representational Image/ Photo credits: SWNS)

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील संगमेश्वर (Sangameshwar) तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 162 गावठी बॉम्ब दहशतवादविरोधी पथक (Anti-Terrorist Squad) आणि स्थानिक पोलिसांनी (Local Police) जप्त केले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 12 तास चाललेल्या या ऑपरेशनदरम्यान बॉम्ब शोध आणि डिस्पोजल पथकाने (Bomb Detection and Disposal Squad) देखील पोलिसांची मदत केली. याप्रकरणी मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

वन्यप्राण्यांची हत्या करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जाणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गेल्या दोन महिन्यांत बॉम्ब सापडण्याची ही तिसरी घटना आहे. "गावठी बॉम्बची डिलिव्हरी होण्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मध्य प्रदेशमधील 40 वर्षीय व्यक्ती अब्बास आलिया कल्लू कढालाल बहेलिया ही व्यक्ती संशयाच्या फेऱ्यात होती. शिवधरमपूर गावाजवळील जंगलामध्ये या व्यक्तीला संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांनी पाहिले. या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडून 162 गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले," अशी माहिती रत्नागिरी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्ब पथकातील कुत्र्यांचे साहाय्य घेण्यात आले. काही बॉम्ब हे बादलीमध्ये सापडले. आरोपीला अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (मुंबईतील मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा आरोपी शैलेश शिंदे याला पोलिसांकडून अटक)

या गावठी बॉम्बवर एका वेगळ्या प्रकारचे कोटिंग असते ज्यामुळे ते खाण्यासाटी वन्यप्राणी जवळ येतात आणि प्राण्याने जर ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होऊन प्राणी जागीच ठार होतो. या मृत झालेल्या प्राण्याचे मांस आणि शरीरातील इतर भाग विक्रीसाठी नेले जातात. दरम्यान, या आरोपीने 2016 मध्ये देखील जिल्ह्यात बॉम्ब आणले होते. परंतु, त्यावेळी तो पळ काढण्यात यशस्वी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.