ठाण्यात Blinkit च्या फ्रीजरमध्ये आढळला उंदीर, मुंबईतील झुरळांच्या प्रकरणानंतर अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कल्याणमधील ताज्या प्रकरणावर अद्याप एफडीएकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र नागरिकांच्या तक्रारींनंतर या केंद्राची पाहणी होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात Blinkit च्या फ्रीजरमध्ये आढळला उंदीर, मुंबईतील झुरळांच्या प्रकरणानंतर अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Rat Found in Blinkit Ice Cream Freezer in Thane

Rat Found In Blinkit Ice Cream Freezer In Thane: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील गोदरेज हिल परिसरातील ब्लिंकिटच्या एका डिलिव्हरी सेंटरमध्ये आइस्क्रीम साठवण्याच्या फ्रीजरमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) तातडीने कारवाईची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका ब्लिंकिट (Blinkit) स्टोअरमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याने त्या ठिकाणचा परवाना निलंबित करण्यात आला होता, त्या पाठोपाठ ही घटना समोर आल्याने क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

व्हिडिओमध्ये नेमके काय दिसते

गोदरेज हिल भागातील या फुलफिलमेंट सेंटरमध्ये गोठवलेले खाद्यपदार्थ आणि आइस्क्रीमच्या साठवणुकीच्या क्रेटमध्ये उंदीर फिरत असल्याचे फुटेजमध्ये दिसते. हा व्हिडिओ स्थानिक ग्राहकांनी शेअर केल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला. ऑनलाइन किराणा आणि खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गोठवलेले पदार्थ किती सुरक्षित परिस्थितीत साठवले जातात, याबाबत शंका उपस्थित केली आहे.

नागरिकांनी एफडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना या केंद्राची तातडीने पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. नक्की वाचा: Maharashtra FDA च्या कारवाईत 4 Domino’s आउटलेट्सचे परवाने रद्द, पहा कोणती आऊटलेट्स रडारवर .

मुंबईतील झुरळांच्या प्रकरणानंतर आता उंदीर

 राज्याचे अन्न व औषध प्रशासन क्विक कॉमर्स आणि अन्नविक्री आस्थापनांविरोधात व्यापक तपासणी मोहीम राबवत आहे असतानाच आता हे अजून एक प्रकरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी ७ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका ब्लिंकिट स्टोअरची तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये फळे व भाज्यांच्या साठ्याजवळ झुरळे आढळली, तसेच मुदतबाह्य व खराब पॅकेजिंग असलेले पदार्थही सापडले होते. या तपासणीनंतर एफडीएने अन्नसुरक्षा व मानक कायद्याच्या कलम ३२(३) अंतर्गत संबंधित स्टोअरचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला होता.

 जुलै महिन्यातही पुण्यातील ब्लिंकिटच्या एका वेअरहाऊसमध्येही तपासणी करण्यात आली होती, तिथे साठवलेल्या खाद्यपदार्थांवर बुरशी आढळल्याने त्या ठिकाणचाही परवाना रद्द करण्यात आला होता.

राज्यव्यापी कारवाई मोहीम

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या "सेफ फूड, सेफ मेडिसिन, सेफ महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत राज्यभरात अन्न आस्थापनांची तपासणी सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्ट या क्विक कॉमर्स कंपन्यांशी संबंधित सुमारे १४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी झुरळे, पाली आणि मुदतबाह्य उत्पादने आढळून आली आहेत.

तसेच मुंबईतील मालाड भागातील एका आस्थापनेच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर, अस्वच्छ शीतकरण व्यवस्था आणि खराब झालेली पॅकबंद उत्पादने आढळल्याने त्या ठिकाणचाही परवाना निलंबित करण्यात आला होता. या तपासणीत खाद्यपदार्थ थेट जमिनीवर किंवा अस्वच्छ रॅकवर ठेवलेले आढळले होते, तसेच कीटक व उंदीर नियंत्रणाच्या ठोस उपाययोजनांचा अभावही निदर्शनास आला होता.

साखळी उपाहारगृहांवरही कारवाई

क्विक कॉमर्स केंद्रांव्यतिरिक्त एफडीएने राज्यभरातील १०४ साखळी उपाहारगृहांचीही विशेष तपासणी केली आहे. यामध्ये दोन आस्थापनांचे कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले, ९५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली, तर पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. एका पिझ्झा हट आउटलेटवरही उत्पादनांच्या पॅकेजिंगवर मुदत संपण्याची तारीख नमूद नसल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली. अकोला येथील एका आस्थापनेवर गोठवलेले पनीर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ वापरल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे.

कल्याणमधील ताज्या प्रकरणावर अद्याप एफडीएकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र नागरिकांच्या तक्रारींनंतर या केंद्राची पाहणी होण्याची शक्यता आहे. सलग समोर येत असलेल्या या घटनांमुळे क्विक कॉमर्स कंपन्यांच्या साठवणूक व स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. राज्य सरकारची तपासणी मोहीम अद्याप सुरू असून, येत्या काळात आणखी आस्थापनांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2026 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).