Rape Charge: 'भारतीय समाजात कोणतीही मुलगी बलात्काराचा खोटा आरोप लावणार नाही’, मुंबई कोर्टाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला सुनावली 10 वर्षांची शिक्षा
पीडितेने खोटी साक्ष देण्याचे कारण नाही. जर तिने असे केले तर तिच्या कुटुंबाला तिच्यासाठी मुलगा शोधण्यात अडचण येऊ शकते. त्या मुलाच्या कुटुंबालाही बदनामीला सामोरे जावे लागू शकते.
कोणतीही मुलगी बलात्काराचा (Rape) खोटा गुन्हा दाखल करत नाही, असे विशेष पॉक्सो कोर्टाचे म्हणणे आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणतीही भारतीय मुलगी बलात्काराचा खोटा आरोप करणार नाही, कारण त्यामध्ये ती खोटी सिद्ध झाल्यास तिच्याकडे आयुष्यभर तुच्छतेने पाहिले जाईल आणि विशेषत: अविवाहित मुलीच्या बाबतीत तिला वैवाहिक जीवनाबाबतच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, जोपर्यंत गुन्हा प्रत्यक्षात घडला नाही तोपर्यंत, एखादी मुलगी तिच्या पावित्र्याला बाधा पोहोचवणारी कोणतीही घटना प्रत्यक्षात घडली आहे हे स्वीकारण्यास तयार नसते.
न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना हे सांगितले. मुंबईच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने 2021 सालच्या एका प्रकरणात आपला निर्णय दिला आहे. यामध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या तरुणाला 10 वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश एसएम टाकळीकर यांनी निकाल देताना सांगितले की, कोणतीही मुलगी बलात्काराचा खोटा आरोप करत नाही. पीडितेने खोटी साक्ष देण्याचे कारण नाही. जर तिने असे केले तर तिच्या कुटुंबाला तिच्यासाठी मुलगा शोधण्यात अडचण येऊ शकते. त्या मुलाच्या कुटुंबालाही बदनामीला सामोरे जावे लागू शकते. कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले जाऊ शकते. यामुळे मुलीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, म्हणूनच जेव्हा एखादी मुलगी बातालाराचे आरोप करते तेव्हा त्यात काही प्रमाणात तरी तथ्य असते.
या प्रकरणी मुलीने खोटी साक्ष देण्याचे काही कारण नसल्याचे विशेष न्यायाधीशांनी सांगितले. अहवालानुसार, आरोपी पीडितेच्या शेजारी राहत होता आणि तिचा चांगला मित्र होता. पीडितेचे आरोपीशी कोणतेही वैर नव्हते. तरीही ती त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत आहे, त्याच्याविरुद्ध साक्ष देत आहे. त्यामुळे हे आरोप खरे वाटतात. अर्थात, तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध आहेत, असे गृहीत धरले, तर तरुणाला तिचे लैंगिक शोषण करण्याचा अधिकार मिळतो का? मुलीच्या वैद्यकीय अहवालातही तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात तरुणाला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा: Ahmednagar Crime News: विवाहीत पुतणीसोबत काकाचे विवाहबाह्य संबंध, दुसऱ्या तरुणाशी बोलल्याच्या रागातून हत्या)
दंडाच्या रकमेतून मुलीला 10,000 रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले जातील. पोलीस प्रकरणानुसार, ही घटना 10-11 मे 2021 च्या मध्यरात्री घडली. मुलगी झोपण्यासाठी शेजारी राहत असलेल्या आजीच्या घरी गेली होती. मात्र बराच वेळ ती गायब राहिली. मुलगी आजीच्या घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्रभर तिचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी रडत घरी आली आणि तिने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.