सोलापूर: राष्ट्रवादीच्या गडाला हादरा; रणजितसिंह मोहिते पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश
Ranjitsinh Mohite-Patil with Vijaysinh Mohite–Patil | (Photo Credits- Facebook)

Lok Sabha Elections 2019: काँग्रेस नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे चिरंजीव सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) पाटील यांनी भाजप प्रवेश केला. या प्रवेशानंतर सुरु झालेली चर्चा अद्याप थांबली नाही. तोवरच भाजप राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाच्या गडालाही हादरा देण्याच्या तयारीत आहे. हा हादरा रणजित सिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांच्या रुपाने बसणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 काँग्रेस विरोधी मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रुपात हा गड कायम राखला होता. रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या मुलानेच पक्ष सोडला तर, राष्ट्रवादीसाठी हा किल्ला राखताना मोठी अडचण होणार आहे.

विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतच राहणार

रणजितसिंह मोहिते पाटील हे उद्या (20 मार्च 2019) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त लोकमत न्यूज 18 डॉट कॉमने दिले आहे. या वृत्तानुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दरम्यान, पुत्र रणजितसिंह सिंह मोहिते पाटील जरी भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी, विजयसिंह मोहिते पाटील मात्र राष्ट्रवादीच राहणार असल्याचे समजते. (हेही वाचा, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश)

Ranjitsinh Mohite-Patil with Vijaysinh Mohite–Patil | (Photo Credits- Facebook)

रणजित मोहिते पाटील यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, रणजित मोहिते पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे, या पोस्टमध्ये ते म्हमतात, 'सर्व सामान्य जनता हेच आपले स्वतःचे कुटुंब मानून गेली अनेक वर्षे काम करताना येथील आपल्यासारखा कार्यकर्ता हाच मार्गदर्शक मानला आहे. आपल्या सर्वांच्या विचारांनीच आजवरची प्रत्येक दिशा ठरवली आहे. तुमचा निर्णय हाच माझा निर्णय असेल. सांगा कसं करायचं....असचं सहन करत राह्यचं... का पेटून उठायचं... आपल्या प्रगतीसाठी...विकासासाठी..... आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी....... ठरवायचयं... तुमच्या साक्षीने....तुमच्या साथीने. या मग.... मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणा-या सर्व कार्यकर्ते यांना विनंती *आज दुपारी ठिक-3:00 वाजता शिवरत्न बंगला अकलूज* येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती. (हेही वाचा शरद पवार माढा येथून निवडणुक लढवणार नाहीत)

मुलांच्या पक्षांतरावरुन राजकीय वर्तुळात शाब्दीक चकमक

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंत्र आव्हाड यांनी टमुले पळवणारी टोळीट असा खोचक उल्लेख करत या पक्षप्रवेशावर टीकात्मक टोला लगावला. तर, भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी 'वेळ पडली तर नातूही पळवू' अशी प्रतिकात्मक प्रतिक्रिया आव्हाड यांना दिली. तर, 'मुलांचे लाड पुरवता पुरवता युतीचे पाळणाघर करु नका' अशी कोपरखळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपला लगावली होती. ठाकरे यांच्या विधानाला शरद पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर केलेल्या 'इतरांच्या मुलाचे लाड मी कशाला पुरवू' या वाक्याचा संदर्भ होता.