Raj Thackeray's Pune Rally: राज ठाकरे यांच्या पुणे सभेसाठी पोलिसांनी घातल्या 13 अटी; उल्लंघन झाल्यास होणार कारवाई
आता या पुणे मेळाव्यानंतर अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 22 मे च्या पुण्यातील मेळाव्याच्या एक दिवस आधी शहर पोलिसांनी 13 अटी जारी केल्या आहेत. या अटी त्यांनी सार्वजनिक रॅलीदरम्यान पाळल्या पाहिजेत असे सांगण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, घातलेल्या अटींचे उल्लंघन म्हणजे कायदेशीर कारवाईला आमंत्रण असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, मनसे प्रमुखांनी त्यांचा नियोजित अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे, जो 5 जून रोजी नियोजित होता. आता या पुणे मेळाव्यानंतर अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.
या पुणे दौऱ्याआधी राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचा टीझर लाँच झाला आहे. यामध्ये राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी घातलेल्या अटी-
-
- जाहीर सभा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कोणत्याही सभेच्या ठिकाणी व वेळेवरच व्हावी.
- सभेला उपस्थित राहणार्या वक्त्यांनी दोन समुदायांमध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या आणि व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- सभेदरम्यान, वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किंवा त्यांनी पाळलेल्या रूढी-परंपरांचा कोणत्याही व्यक्तीकडून अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- सभेला उपस्थित राहणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि सभेच्या ठिकाणाहून ये-जा करताना असभ्य वर्तन करू नये.
- कार्यक्रमादरम्यान कोणतीही शस्त्रे, तलवारी, स्फोटके सोबत बाळगू नयेत.
- सभेदरम्यान स्वयंसेवकांची नियुक्ती करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि त्यांच्या प्रशासनाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
- सभा स्थळ व सार्वजनिक ठिकाणी स्वागत फलक वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावावे.
- मुख्य मंचावर उपस्थितांची संख्या आयोजकांनी ठरवावी. कोणीही अनोळखी व्यक्ती मंचावर येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही याची काळजी घ्यावी.
- सभेच्या ठिकाणी लाऊडस्पीकरच्या संदर्भात शासनाने निश्चित केलेल्या आवाजांच्या नियमाबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी.
- सभेच्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपास करण्याचे अधिकार पोलिसांना असावेत.
- कोणत्याही अत्यावश्यक सुविधा, रुग्णवाहिका, रुग्णालय, बससेवा व वाहतुकीला या सभेचा फटका बसणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
- सभेच्या ठिकाणी येणार्या ज्येष्ठ महिला व मुलांची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व त्यांना स्वतंत्र आसनव्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. (हेही वाचा: नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेस नेते 7 जूनला जाणार अयोध्येला; महंत बृजमोहन दास यांचे निमंत्रण स्वीकारले)
दरम्यान, महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादामध्ये मनसे प्रमुख केंद्रस्थानी आहेत. 12 एप्रिल रोजी मनसे प्रमुखांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. 3 मे नंतर ज्या भागात 'अजान'साठी लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल, त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.