कोकण रेल्वेची वेबसाईट मराठीत करावी; रेल्वे प्रवासी सेवा संघाची मागणी

त्यामुळे काही प्रवाशांना हिंदी तसेच इंग्रजीमध्ये ऑनलाईन आरक्षण करताना समस्या येतात. म्हणूनच कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठीत करावे, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे.

Konkan Railway (PC - Instagram)

राज्यात कोकण रेल्वेने (Kokan Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातील काही प्रवाशी आपले तिकीट ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करत असतात. मात्र कोकण रेल्वेचे संकेसस्थळ (वेबसाईट) केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे काही प्रवाशांना हिंदी तसेच इंग्रजीमध्ये ऑनलाईन आरक्षण करताना समस्या येतात. म्हणूनच कोकण रेल्वेचे संकेतस्थळ (Website) मराठीत करावे, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. यासाठी त्यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालकाकडे निवेदन दिले आहे. राज्यातील खासदारांनीही याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंतीदेखील कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. (हेही वाचा - कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर; 'तुतारी एक्सप्रेस' ला जोडले जाणार आता 4 अतिरिक्त डब्बे)

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस हे 1989 ते 1990 दरम्यान रेल्वे मंत्री होते. त्यावेळी त्यांनी कोकण रेल्वे झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली. फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी वेगळ्या महामंडळाची निर्मिती केली होती. त्यांच्या अथक परिश्रमाने कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला. 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली. 1 मे 1998 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय यांनी 760 किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वेचे मार्गाचे उद्घाटन केले. कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 400 कोटी रुपये खर्च झाले.

या प्रकल्पात कोकणचे दिवंगत खासदार मधू दंडवते यांचेही मोठे योगदान आहे. कोकण रेल्वे प्रकल्पाने भारताचा उत्तर भाग आणि पश्चिम भाग दक्षिण भारताला जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरला. कोकण रेल्वेचा संपूर्ण कारभार महाराष्ट्रातून चालवण्यात येतो. पंरतु, याचा सर्वात जास्त फायदा दुसऱ्या राज्यातील नागरिक घेत आहेत, अशी खंत कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे सचिव दर्शन कासले यांनी व्यक्त केली.