Raigad Shiv Jayanti 2021: 19 आणि 20 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर निशुल्क प्रवेश
या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे.
Raigad Shiv Jayanti 2021: राज्य सरकारने शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) शिवभक्तांना एक खुशखबर दिली आहे. नागरिकांना शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर (Raigad Fort) 2 दिवस म्हणजेच 19 आणि 20 फेब्रुवारीला निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने यास परवानगी दिली आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राजगड किल्ल्यावरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शिवजयंतीदिनी कलम 144 लागू केल्याने अनेक मराठा संघटना, शिवभक्त आणि विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (वाचा - Shiv Jayanti 2021: कडबा वापरुन अर्ध्या एकरात साकारली शिवप्रतिमा; सोलापूर येथील महाविद्यालयीन युवकांची कलात्मकता (पाहा VIDEO))
कोरोना विषाणूच्या सावटामुळे यंदा सर्वचं सण-उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून केल्या जात आहेत. अशातचं राज्य सरकाने शिवजयंतीनिमित्त काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, अशा गाईडलाईन्स सरकारकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय शिवजयंतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात यावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम उदा रक्तदान शिबिरं आयोजित करावीत, आदी मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. शिवजयंतीच्या दिवशी मुंबईत कलम 144 लागू केल्यानंतर भाजप पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. अशात आता शिवभक्तांना सरकारने दिलासा देत 19 आणि 20 फेब्रुवारीला राजगडावर निशुल्क प्रवेश देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.