काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून साधला संवाद; पाहा काय म्हणाले?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकारविषयी पक्षाची भूमिका मांडली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली होती.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट गहिर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडमोडी घडत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकारविषयी पक्षाची भूमिका मांडली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. दरम्यान, विरोधीपक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीविरुद्ध टीकेची झोड उठवली होती. तसेच काँग्रसेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात होती. यातच राहुल गांधी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. कोरोना विरुद्ध लढाईत आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करु”, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसे तणावाचे बनलेले वातावरण निवळण्याची चिन्हे आहेत.

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीतील संभ्रम आणखी वाढला होता. दरम्यान, विरोधकांनीही काँग्रेसवर टिका केली होती. राज्यात सुरू झालेल्या चर्चांनंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला. तर, तर “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडले देवेंद्र फडणवीस यांचे आकडे; पोस्ट केला Video, दिले आव्हान

दरम्यान, राष्ट्रवादी आणिा काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि हे सरकार पाच वर्षाचा कालावधी नक्की पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मनातली खदखद बाहेर पडताना दिसत आहे. सरकारला भक्कम पाठिंब्याची गरज असताना काँग्रसेचा सूर काही वेगळाच आहे. याआधीही काँग्रस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी मुख्यमंत्र्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.