Rahul Gandhi In Pandharpur Ashadhi Wari: राहुल गांधी विठ्ठल रखुमाई चरणी? आषाढी वारीत चालण्याची शक्यता
येत्या 17 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त ते पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन गेणार असल्याचे समजते.
आषाढी आणि कार्तिकी एकादशनिमित्त केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि जगभरातून भाविक पंढरपूरला (Pandharpur) येतात. विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटी स्नान करतात. पांडुरंगाला भेटल्यावर त्यांना आत्मिक समाधान होते. त्यासाठी आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) आणि कार्तिकी वारीमध्ये वारकरी स्वत:हून सहभागी होतात. दरम्यान, यंदाच्या वर्षी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 17 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त ते पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन गेणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रात राजकीय यश टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील
राहुल गांधी अथवा काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, खासगी वृत्तवाहिणी एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक घोषीत व्हायला अवघे तीन ते चार महिने बाकी आहेत. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे कामगिरीची सलगता कायम ठेवायची असेल तर स्थानिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाकडून भक्कम प्रयत्न व्हायला हवेत, याची जाणीव पक्षातील नेत्यांना आहे. परिणामी त्यानुसारच पुढील रणनिती आखली जात आहे. या रणनितीचाच एक भाग म्हणून राहुल गांधी पंढरपूरला येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातूनही व्यक्त होऊ लागली आहे. (हेही वाचा, Ashadhi Wari: पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाई दर्शन वारकऱ्यांना 24 तास उपलब्ध, मंदिर स्ट्रस्टचा निर्णय)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस मोठे यश
राहुल गांधी यांनी अलिकडेच भारत जोडो यात्रा करुन अवघा भारत उभा आणि आडवा पिंजून काढला. त्यामुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा प्रचंड बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमध्ये राहुल यांच्या बदलत्या परिस्थितीचे प्रतिबींब दिसले. लोकसभा निवडणुकीत शून्य ते 13 अशी खासदार संख्या मिळवलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात विधानसभेतही यश मिळवायचे असेल तर, पुन्हा एकदा लोकांमध्ये जाणे आवश्यक वाटू लागले आहे. परिणामी त्यासाठी आषाढी वारीसारख्या मंचाचा वापर केला जाऊ शकतो. (हेही वाचा, Rahul Gandhi: संविधान हातात घेऊन राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ, भाजपच्या खासदारांनी दिला 'जय श्री राम'चा नारा)
दरम्यान, पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' असा उपक्रम असतो. ज्यामध्ये राज्यातील अनेक साहित्यिक, विचारवंत, पत्रकार आणि सामाजिक, राजकीय नेतेही सहभागी होतात. दरम्यान, या वारीत शरद पवार हे देखील चालणार असल्याचे सांगितले जात आहे. ते बारामती ते इंदापूर सणसपर्यंत चालणार असल्याचे समजते. वारीमध्ये राहुल गांधी, शरद पवार यांच्यासारखे नेते सहभागी झाल्यास त्याची जोरदार चर्चा होऊ शकते. ज्यामुळे जनतेमध्ये मोठा संदेश जाण्याचीही शक्यता आहे.