Rafale Deal Vs AgustaWestland: ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामुळे लोक राफेल विसरणार नाहीत: शिवसेना
मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी (PM Modi) व अनिल अंबानींचे (Anil Ambani) नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे.
Rafale Deal Vs AgustaWestland: ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये. मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी (PM Modi) व अनिल अंबानींचे (Anil Ambani) नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणावरुन केंद्र सरकार आणि भाजप विरोधी पक्ष काँग्रेसची कोंडी करत असतानाच शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षाकडून असा घरचा आहेर मिळाल्यामुळे भाजपला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये ठाकरे यांनी लेख लिहिला आहे. ' मिशन मिशेल-2019 बा-चा-बा-ची' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात उद्धव यांनी ऑगस्टा वेस्टलँड आणि राफेल खरेदी कथीत घोटाळा प्रकरणावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे व क्वात्रोचीनंतर आता देशात मिशेलपुराण सुरू होईल. मिशेल आत आहे व बाहेर भक्तांनी त्याचा जयजयकार सुरू केला आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलॅंड: 'हड्डीवाला कुत्ता' कोण? ख्रिश्चन मिशेल याची डायरी सीबीआयच्या हाती)
दरम्यान, मिशेल यास दुबईतून ताब्यात घेतले व दिल्लीस आणले तेव्हा पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार तापला होता व भाजपच्या बुडास आग लागली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक-दोन मोठ्या प्रचारसभांत मिशेलचा उल्लेख करून सांगितले की, ‘आता बघा काय स्फोट होतात ते. ब्रिटनचा दलाल आणला आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही.’ या सगळ्यांचा अर्थ आता लागत आहे. मिशेल हा सोनिया गांधींचे व त्यांच्या मुलाचे नाव घेणारच हे पक्के होते व तसे संकेत पंतप्रधानांना होते. मिशेलची चौकशी सुरू होण्याआधीच मोदी यांनी गांधींकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली हे जरा गमतीचे वाटते. मिशेल यास हिंदुस्थानात आणूनही पाच राज्यांत मोदीप्रणीत भाजपचा पराभव व्हायचा तो झालाच. पण मिशन मिशेलचे लक्ष्य 2019 आहे व तसे स्पष्टपणे दिसत आहे. मिशेल हा कोठडीत आहे व आतमध्ये काय सुरू आहे ते कुणालाच सांगता येत नाही. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाचा निकाल याचदरम्यान लागला व अमित शहा यांच्यासह सर्वच आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयात म्हणे सीबीआय व इतर तपास अधिकाऱ्यांचे असे निवेदन आहे की, या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांची नावे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता व त्याप्रकरणी ही नावे घेतली गेली. सत्ताबदल झाला नसता तर ही नावे त्या खून प्रकरणात तशीच राहिली असती. आता काँग्रेसवाले नेमके तेच सांगत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी सामनातील लेखात केला आहे.