Pune Shocker: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन

उल्हासनगर,जळगाव, मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे.

Gun Shot | Pixabay.com

पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार (Pune Crime) झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून सराफ व्यवसायिकाने दुकानमालकावर  गोळीबार केला. आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. तर आकाश गजानन जाधव (वय 39,  रा. बाणेर)  असे मृत पावलेल्या दुकानमालकाचे नाव आहे.  (हेही वाचा - Pune Crime: पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनवरुन हॉटेलमध्ये राडा; 20 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण)

तीन महिन्यापासून ढमाले याला जाधव हे आर्थिक कारणावरुन त्रास देत होते, असे सांगितले जात  आहे. आता  मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचे ढमाले यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळले आहे. गोळीबारानंतर ढमाले यांनी स्वतः गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकाराने पुण्यातील औंध भागात खळबळ पसरली आहे. अनिल ज्वेलर्स नावाचे दुकान अनिल ढमाले चालवत होते.तर आकाश जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना 14 वर्षांपासून  दुकान भाड्याने दिले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत आहेत. उल्हासनगर,जळगाव, मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या सलग घडणाऱ्या घटनेमुळे राज्यात पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.