Pune Sexual Assault: भाड्याने खोली दाखवण्याच्या बहाण्यने 39 वर्षीय महिलेवर बलात्कार, पुणे येथील घटना
मणक्याच्या विकारावर (Spinal Disorder) निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका महाराष्ट्राबाहेरील महिलेवर भाड्याने खोली दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
मणक्याच्या विकारावर (Spinal Disorder) निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका महाराष्ट्राबाहेरील महिलेवर भाड्याने खोली दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे (Pune ) शहरातील हडपसर (Hadapsar) पोलिसांनी या प्रकरणी संजय बाजीराव भोसले (वय 52 वर्ष, रा. उरुळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडिता (वय वर्षे 39) मुळची गाझीयाबाद येथील राहणारी आहे.
दिल्लीजवळील गाझियाबाद येथी मूळ रहिवासी असलेली पीडिता वैद्यकीय उपचारांसाठी पुणे येथे आली होती. उपचार घेण्यासाठी ती उरळी कांचन परिसरात भाड्याने खोली शोधत होती. उरुळी कांचन परिसरातील निसर्गोपचार केंद्रात ती उपचारासाठी आल्याने परिसरातच तिला खोली हवी होती. दरम्यान, एका व्यक्तीमार्फत तिची आरोपीसोबत ओळख झाली. आरोपीनेही जुजबी ओळखीचा फायदा घेत तिला खोली भाड्याने देण्याचे आमिश दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. (हेही वाचा, Nallasopara Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकजण ताब्यात; आरोपी देखील अल्पवयीन)
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीने पीडितेला खोली भाड्याने देण्याची सातत्याने बतावणी केली. तो तेवढ्यावरच थांबला नाही. तो तिला भाड्याच्या खोलीचे आमीश दाखवत हडपसरला घेऊन गेला. तिथे एका सोसायटीत नेत त्याने तिला पिस्तूलाचा धाक दाखवला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती जर कोणाला दिलीस तर जिवे मारु अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यानंतर पीडिता पोलिसांत आली आणि तिने तक्रार दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्यावर बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी भोसलेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 12:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

