Pune: गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू; प्रियकराने तिच्या दोन मुलांसह मृतदेह फेकला नदीत
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण गूढ उलगडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 9 जुलै रोजी घडली होती.
पुण्यात (Pune) गर्भवती महिला आणि तिच्या मुलांच्या मृत्यूचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 25 वर्षीय गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या प्रियकराने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह नदीत फेकला. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणाने प्रेयसीच्या दोन मुलांनाही तिच्या मृतदेहासोबत नदीत फेकले. गजेंद्र असे मुख्य आरोपीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी गजेंद्र आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला होता.
अहवालानुसार, महिलेच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण गूढ उलगडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 9 जुलै रोजी घडली होती. 6 जुलै रोजी प्रियकराचा मित्र रवी गायकवाड हा गर्भवती महिला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षाच्या मुलांसह कळंबोली येथे गेला होता. तेथील अमर हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात झाला, मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 8 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर गर्भपात करणाऱ्या महिला एजंटने यामध्ये मध्यस्थी केली, आणि प्रियकर गजेंद्रचा दुसरा मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत मृतदेह पुण्यातील मावळ येथे आणला. त्यानंतर 9 जुलैच्या अंधारात गजेंद्र आणि रविकांतने मृतदेह इंद्रायणी नदीच्या प्रवाहात फेकून दिला. त्याचवेळी महिलेची दोन्ही मुले रडू लागल्याने दोघांनी मिळून दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिले. (हेही वाचा: Pune Shocker: मानवतेला काळिमा! पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अपंग रुग्णाला रात्री निर्जनस्थळी सोडून दिले; गुन्हा दाखल, डॉक्टर निलंबित)
त्यानंतर अनेक दिवस महिला न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी गजेंद्रला ताब्यात घेतले. कडक चौकशीत गजेंद्रने संपूर्ण हकीकत सांगितली. त्याचवेळी गजेंद्रच्या सांगण्यावरून पोलिसांनी गजेंद्र आणि त्याच्या मित्रांनाही अटक केली. महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. गजेंद्रने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो तरुणीला भेटला तेव्हा तिचे पतीसोबत भांडण होत होते. त्यानंतर तो महिला आणि दोन मुलांसह दुसऱ्या भाड्याच्या घरात राहू लागला. यादरम्यान महिला गरोदर राहिली होती.