पुण्यात 18-31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू, पाच किंवा अधिक लोकांच्या जमावासाठी पोलिस परवानगी बंधनकारक
पुणे पोलिसांनी १८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावासाठी आता पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात आगामी सण-उत्सव, सामाजिक-राजकीय कार्यक्रम आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी १८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१), ३७(२) आणि ३७(३) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हा प्रतिबंध १८ ऑगस्ट रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहणार आहे.
पाच किंवा अधिक लोकांच्या जमावासाठी परवानगी बंधनकारक
आदेशातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची सभा, बैठक किंवा मिरवणूक आयोजित करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवानगी कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा मिरवणूक काढल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
हा निर्णय का घेण्यात आला?
पुणे शहरात वेळोवेळी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे-आंदोलन, बंद आणि इतर आंदोलने आयोजित केली जातात. याशिवाय अतिक्रमणविरोधी कारवाई आणि इतर संवेदनशील मुद्द्यांदरम्यानही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आगामी ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसारख्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आदेशात कोणकोणत्या गोष्टींवर बंदी?
प्रतिबंधात्मक आदेशांतर्गत सार्वजनिक ठिकाणी दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ, दगड, शस्त्रे किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणारे साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही व्यक्ती, नेता किंवा संघटनेच्या प्रतिमा, प्रतीकात्मक पुतळे किंवा मूर्तींचे प्रदर्शन अथवा दहन करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील, आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर घोषणा देणे, भडकाऊ गाणी गाणे, वाद्ये वाजवणे आणि सामाजिक सौहार्द किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या इतर कृतींवरही निर्बंध असणार आहेत.
सोशल मीडियावरील रील्सवरही करडी नजर
आदेशात एक महत्त्वाची तरतूद जोडण्यात आली असून, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या, दहशत पसरवणाऱ्या किंवा धमक्या देणाऱ्या सोशल मीडिया रील्स आणि व्हिडिओ तयार करून प्रसारित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा डिजिटल सामग्रीच्या प्रसारावर कारवाई केली जाणार आहे.
कोणाला सूट देण्यात आली आहे?
कर्तव्यावर असताना शस्त्रे बाळगण्याची परवानगी किंवा गरज असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही. तसेच, खासगी सुरक्षारक्षक आणि चौकीदार यांना कर्तव्यादरम्यान ३.५ फुटांपर्यंत लांबीची काठी बाळगण्याची मुभा देण्यात आली आहे.
उल्लंघन केल्यास काय होणार?
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. आदेशाचा कालावधी संपल्यानंतरही उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांची चौकशी, जप्ती, दंड किंवा इतर कायदेशीर कारवाई सुरू राहू शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुणे पोलिसांनी हा आदेश व्यापक स्तरावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.