Pune PMPML Bus Breakdowns: पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पीएमपीएमएल अयशस्वी; ऑगस्टमध्ये दररोज सरासरी 87 बसेसमध्ये बिघाड

पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड रस्त्यावर पीएमपीएमएल बसच्या बिघाडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

PMPML BUS

एकीकडे सरकार, प्रशासन सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्याचे आवाहन करत असते, मात्र दुसरीकडे उत्तम वाहतूक सुविधा पुरवण्यात कमी पडते. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) बसेसबाबत तक्रारी येत आहेत, मात्र त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. जीर्ण बस, बेपर्वा वाहन चालवणे, बसच्या बिघाडात होणारी वाढ यामुळे प्रवाशांना त्यावर अवलंबून राहणे कठीण होत आहे, परिणामी पीएमपीएमएलचे नुकसान होत आहे.

सर्वसामान्य पुणेकर त्यांच्या परवडणाऱ्या दैनंदिन प्रवासासाठी पीएमपीएमएलवर अवलंबून असतात, पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पीएमपीएमएल अयशस्वी ठरत आहे. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड रस्त्यावर पीएमपीएमएल बसच्या बिघाडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पीएमपीएमएल बसेसने एका महिन्यात 500 ते 600 ब्रेकडाउनची तुलनेने स्थिर श्रेणी कायम ठेवली, तर भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये झपाट्याने वाढ होऊन ती, जानेवारीतील 1,372 वरून ऑगस्टमध्ये 2,713 वर गेली. एकट्या ऑगस्टमध्ये, पीएमपीएमएलच्या 561 बसेसमध्ये बिघाड (दररोज सरासरी 18) झाले. भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये 2,152 ब्रेकडाउन होते (दररोज सरासरी 69). (हेही वाचा: 'Aapli PMPML' Mobile App: पुणेकरांना दिलासा! लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप; जाणून घ्या कशी होईल मदत)

पीएमपीएमएल बसेसमध्ये बिघाड हा गंभीर प्रश्न बनला असून, ज्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. भरीव कमाई असूनही, सेवेचा दर्जा सुधारण्यात पीएमपीएमएल अयशस्वी ठरली असून, ज्यामुळे प्रवासी निराश झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 2023-24 आर्थिक वर्षात, पीएमपीएमएलने 11.07 कोटी रुपये इतका भरीव महसूल मिळवला आणि सप्टेंबर 2024 पर्यंत, 2.95 कोटी केवळ जाहिरातींमधून मिळाले. सध्या, एकूण ताफ्यात 1,928 बसेसचा समावेश आहे, ज्यात 871 खाजगी कंत्राटदार चालवतात.