Pune BJP: पुणे भाजप हादरला? नाराज 19 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वृत
भाजपमधील कोणीही बाहेर पडणार नाही. प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या देणं बंद करावे. उलट भाजपमध्येच बाहेरून अनेक लोक येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांंगितले.
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation ) सत्तेत असलेला भाजप (BJP) सध्या नाराजीनाट्यात रंगल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक ( BJP Corporator) नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या संपर्कात असल्याचे समजते. कही नगरसेवक तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थातय या सर्व वृत्ताचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे आणि मुक्ता टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी खंडण केले आहे. भाजप नेत्यांनी जरी या वृत्ताचे खंडण केले असले तरी प्रसारमाध्यमांनी मात्र विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
खासगी वृत्तवाहिनी असलेल्या एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. पदवाटपात पुरेशी संधी आणि विकासकामांना निधी मिळत नसल्याने हे नगरसेवक नाराज असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भाजपमध्ये कोणीही नाराज नसते. भाजपमधील कोणीही बाहेर पडणार नाही. प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या देणं बंद करावे. उलट भाजपमध्येच बाहेरून अनेक लोक येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांंगितले. (हेही वाचा, Shiv Sena on Gram Panchyat Election Result: विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली - शिवसेना)
पुणे भाजपा नगरसेवकांमध्ये असलेल्या नाराजीबाबत बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, निधीचा काहीच विषय नाही. सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. सर्वांना निधी दिला जात आहे. पदांबाबत बोलायचे तर सर्वांना एकाच वेळी संधी दिली जाऊ शकत नाही. काहींना गेल्या वर्षी संधी मिळाली काहींना या वर्षी संधी मिळेल. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्या निराधार आहेत, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले. (हेही वाचा, दोन पाद्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश)
भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनीही या वृत्ताचे खंडण केले आहे. काही नगरसेवक तर आता या क्षणाला माझ्या घरी आहेत. त्यांच्यापैकी कोणीही नाराज नाही. मी इतरही काही नगरसेवकांकडे चौकशी केली. तर कोणीही नाराज नसल्याचे समजले. त्यामुळे विरोधकच आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काही असल्या बातम्या पेरत असावेत असे संजय काकडे यांनी म्हटले.
भाजप नेत्या आणि माजी आमदार मुक्ता टिळक यांनी सांगितले की, पुणे महापालिकेतील कोणताही नगरसेवक नाराज नाही. सर्वजण मिळून काम करत असल्याचे टिळक यांनी म्हटले आहे.