Pune MHADA Lottery 2026 Application Last Date: म्हाडा पुणे घरांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

म्हाडाच्या पुणे लॉटरी २०२६ अंतर्गत ४,४६२ घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, ऑनलाइन अर्ज व पेमेंट करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. सोडतीचे वेळापत्रक आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती.

MHADA

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) पुणे विभागासाठी जाहीर केलेल्या घरकुल सोडतीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सोडतीअंतर्गत 4462 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, ऑनलाइन अर्ज करण्याची आणि अनामत रक्कम (EMD) भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजता संपणार आहे. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026: 11 लाखांपासून पुण्यात 4,462 घरांसाठी लॉटरी जाहीर; कोण करू शकते अर्ज? 

म्हाडा पुणे घरांसाठी अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक

म्हाडाच्या या पुणे मंडळातील सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल आणि याच तारखेपर्यंत ऑनलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध असेल. जे अर्जदार RTGS किंवा NEFT द्वारे रक्कम भरणार आहेत, त्यांना 16 सप्टेंबर रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रियेतील शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी किंवा बँकिंगसंबंधी समस्या टाळण्यासाठी अर्जदारांनी मुदतीपूर्वीच अर्ज व पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

पुढील टप्प्यांचे वेळापत्रक

अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर म्हाडा स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करणार आहे. या यादीत काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास अर्जदारांना 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती व दावे नोंदवण्याची संधी दिली जाईल.

आक्षेपांची छाननी झाल्यानंतर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 8 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर या सोडतीची ऑनलाइन घरकुल सोडत 12 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन सादर करावा लागेल. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र किंवा संबंधित आरक्षण प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार जोडीदाराचे आधार व पॅन तपशीलही सादर करावे लागू शकतात.

म्हाडाची संपूर्ण सोडत प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने अर्जासोबत कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026 Registration: म्हाडा पुणे लॉटरी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.  

एकापेक्षा अधिक प्रवर्गातून अर्जाची संधी

म्हाडाच्या सर्वसाधारण सोडत नियमांनुसार, एकापेक्षा अधिक प्रवर्गांसाठी पात्र असलेल्या अर्जदारांना संबंधित प्रवर्गांमधून अर्ज करण्याची मुभा दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, राखीव प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग या दोन्हींसाठी पात्र असलेला अर्जदार दोन्ही प्रवर्गांतून अर्ज करू शकतो. मात्र हे नियम प्रत्येक योजनेनुसार बदलू शकतात, त्यामुळे अर्जदारांनी प्रवर्ग निवडण्यापूर्वी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक तपासावी.

पूर्वीच्या सोडतींपेक्षा वेगळी योजना

सध्याची ४,४६२ घरांची सोडत यापूर्वी झालेल्या पुणे मंडळाच्या ७९२ सदनिकांच्या सोडतीपेक्षा वेगळी आहे. त्या सोडतीची संगणकीय सोडत २५ जून २०२६ रोजी पार पडली होती. यापूर्वी म्हाडाने पुणे व पिंपरी-चिंचवड भागांत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर २९५ सदनिकांच्या विक्रीचीही योजना जाहीर केली होती.

म्हाडाची ही सोडत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास कायदा, १९७६ अंतर्गत राबवली जात आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज, पेमेंट आणि हरकतींच्या मुदतींची नोंद ठेवून वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement