MHADA Pune Lottery 2026: 11 लाखांपासून पुण्यात 4,462 घरांसाठी लॉटरी जाहीर; कोण करू शकते अर्ज?

म्हाडाच्या पुणे मंडळाने ४,४६२ घरांसाठी ऑगस्ट २०२६ लॉटरी जाहीर केली असून, अर्ज प्रक्रिया २४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि उत्पन्न मर्यादा काय आहे, याबाबत सविस्तर माहिती.

MHADA Pune Lottery 2026: 11 लाखांपासून पुण्यात 4,462 घरांसाठी लॉटरी जाहीर; कोण करू शकते अर्ज?
Pune MHADA Home| Image Use For Representative Purpose

MHADA Pune Lottery 2026 Eligibility Criteria: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) पुणे मंडळाने सामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी नवी लॉटरी जाहीर केली असून, यामध्ये एकूण 4462 घरांचा समावेश आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 आहे. या लॉटरीमध्ये कोण अर्ज करू शकतो, याबाबत तुमच्याही मनात उत्सुकता असल्यास जाणून घ्या पुण्यातील म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी नेमकं कोण पात्र आहे?

पुणे म्हाडा घरांच्या लॉटरीचे स्वरूप आणि उपलब्ध घरांची संख्या

पुणे मंडळाच्या या लॉटरीत दोन प्रमुख योजनांचा समावेश आहे. यामध्ये 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1491 घरे आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2971 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध गृहप्रकल्पांमध्ये ही घरे समाविष्ट आहेत.

पुण्यात ही  घरे धानोरी, मोहम्मदवाडी, हडपसर, बाणेर, पाषाण, खराडी, लोहगाव, मुंढवा, धायरी, वारजे, कोंढवा, बावधन, उंड्री, फुरसुंगी, वडगाव, आंबेगाव, मांजरी खुर्द आणि म्हाळुंगेसह पुण्यातील अनेक भागांत उपलब्ध आहेत.

पुणे म्हाडा घरांच्या लॉटरी अर्जासाठी पात्रता निकष

म्हाडाच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे वय अर्ज करताना किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे महाराष्ट्राचा वैध अधिवास (डोमिसाईल) दाखला असणे बंधनकारक आहे, जो सलग किमान 15 वर्षांच्या वास्तव्याचा पुरावा देतो.
  • अर्जदाराकडे वैध पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावे यापूर्वी म्हाडाचे घर किंवा अन्य कोणतीही शासकीय गृहनिर्माण योजनेतील सदनिका नसावी.
  • अर्जदार, त्याचा जोडीदार किंवा अल्पवयीन मुले यांच्या नावे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत स्वतःचे घर, सदनिका किंवा भूखंड नसावा.

म्हाडा घरांसाठी  उत्पन्न गटानुसार पात्रता

म्हाडाच्या योजनेत अर्जदारांचे वर्गीकरण उत्पन्नानुसार चार गटांत केले जाते. पुणे आणि पीएमआरडीए क्षेत्रासाठी हे निकष खालीलप्रमाणे आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) गटासाठी वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे. अल्प उत्पन्न गट (एलआयजी) साठी उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान असावे. मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) साठी उत्पन्न मर्यादा 9 लाख ते 12 लाख रुपये आहे, तर उच्च उत्पन्न गट (एचआयजी) साठी 12 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले अर्जदार पात्र ठरतात.

सध्याच्या लॉटरीत ईडब्ल्यूएस गटासाठी अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम मिळून 15,708 रुपये, तर एलआयजी गटासाठी 20,708 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये 708 रुपयांचे अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना पुढील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

  • अर्जदार आणि जोडीदाराचे आधार कार्ड
  • अर्जदार आणि जोडीदाराचे पॅन कार्ड
  • 1 जानेवारी 2018 नंतर जारी झालेला महाराष्ट्र अधिवास दाखला
  • संबंधित तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
  • आयकर विवरणपत्र (आवश्यक असल्यास)
  • सक्रिय बँक खात्याचे तपशील
  • जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)

विशेष आरक्षण प्रवर्गातील अर्जदार

सर्वसाधारण प्रवर्गाव्यतिरिक्त, या लॉटरीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, दिव्यांग व्यक्ती, माजी सैनिक, संरक्षण दल कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, शासकीय कर्मचारी, आमदार-खासदार आणि कलाकार यांसारख्या विशेष प्रवर्गांसाठीही आरक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रवर्गांतर्गत अर्ज करणाऱ्यांना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक

अर्ज आणि ऑनलाइन पैसे भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे पैसे भरणाऱ्यांना 16 सप्टेंबरपर्यंत बँकेच्या कामकाजाच्या वेळेत मुदत देण्यात आली आहे. प्राथमिक स्वीकृत अर्जांची यादी 29 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल, तर हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर आहे. अंतिम यादी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, संगणकीकृत सोडत 13 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. निकाल त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता जाहीर केला जाईल. नक्की वाचा: CIDCO Lottery 2026: तळोजा, कळंबोली, खारघर मध्ये 4779 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; cidcohomes.com वर नोंदणी सुरू 

गेल्या वर्षी झालेल्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या लॉटरीला सुमारे 1.25 लाख अर्ज प्राप्त झाले होते, ज्यावरून पुण्यातील परवडणाऱ्या घरांच्या मागणीचा अंदाज येतो. दरम्यान, राज्य सरकारच्या 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या निर्णयानंतर 20 टक्के योजनेचे भविष्यातील व्यवस्थापन म्हाडाकडेच राहणार की महानगरपालिकांकडे सोपवले जाणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र सध्या तरी पुणे मंडळाने ही लॉटरी पुढे रेटली असून, इच्छुक अर्जदारांनी अधिकृत माहितीपुस्तिका काळजीपूर्वक तपासून विहित मुदतीत अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2026 12:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).