Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! पुढच्या वर्षीच्या सुरुवातील सुरु होणार Pimpri आणि Phugewadi दरम्यानची मेट्रो; अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आशा

पुणे मेट्रोने मेट्रोच्या मार्गात आलेले एकही झाड तोडले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

मेट्रो सेवा (फोटो सौजन्य-Facebook)

नागपूर आणि मुंबईनंतर आता पुण्यातही मेट्रो (Pune Metro) धावणार आहे. गेले काही वर्षे पुण्यात मेट्रोचे काम सुरु आहे आता हे काम लवकरच पूर्णत्वास पोहोचणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्प राबविणाऱ्या महा मेट्रोला पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पुणे मेट्रो सुरु होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो सेवेचा पहिला प्रवास पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला पिंपरीतील पीसीएमसी मुख्यालयातून सुरू होण्याची अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिंपरी ते फुगेवाडी येथील पीसीएमसी मुख्यालयादरम्यानचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, त्यानंतर शहरातील पहिली मेट्रो ट्रेन दररोज चालवण्याचा त्यांचा विचार आहे.

मेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे म्हणाले की, पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान पाच स्थानके आहेत. दोन स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. सेवा सुरू करण्याची तारीख अद्याप ठरलेली नसून दोन महिन्यांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. पुणे मेट्रोमध्ये सुमारे 33.1 किमी लांबीच्या दोन कॉरिडॉरमध्ये पसरलेल्या 30 स्थानकांचा समावेश आहे. PCMC ते स्वारगेट कॉरिडॉर 17.4 किलोमीटरचा मार्ग 1 मधील शिवाजी नगर ते स्वारगेट पर्यंतचा 6 किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे.

15.4 किमीची वनाज ते रामवाडी पर्यंतची लाईन 4 किमीने वाढविण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे मेट्रोचे 65% काम जवळपास पूर्ण झाले आहे व लवकरच प्रवाशांसाठी महत्वाचे असणारे मार्ग सुरु होतील. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्राधान्य गट आहेत. महामेट्रोचे कार्यकारी अभियंता अतुल गाडगीळ म्हणाले की, संपूर्ण पुणे मेट्रो प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. (हेही वाचा: Under Construction Flyover Collapses: उरणमध्ये बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुल कोसळून एकाचा मृत्यू, तर आठ जण जखमी)

दरम्यान, पुणे मेट्रोने सुरुवातीपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध हरित उपक्रम हाती घेतले आहेत. पुणे मेट्रोने मेट्रोच्या मार्गात आलेले एकही झाड तोडले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे मेट्रोने अशा झाडांचे पुनर्रोपण केले. स्थानिक अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या विविध उद्यानांमध्ये आणि संकुलांमध्ये ही झाडे लावण्यात आली. पुणे मेट्रोने आतापर्यंत 2261 झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली आहेत.