पुणे: पत्नीला खुश ठेवण्यासाठी चोरीचा धंदा; मोबाईल, साड्या, ड्रेस चोरी करणाऱ्या 21 वर्षीय आरोपीला अटक
नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये ही इच्छा अधिकच प्रबळ असते. परंतु, पुण्यातील एका व्यक्तीने बायकोला खूश करण्यासाठी चोराची मार्ग अवलंबला.
आपल्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी सारेच धडपडत असतात. नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये ही इच्छा अधिकच प्रबळ असते. परंतु, पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने बायकोला खूश करण्यासाठी चोराचा मार्ग अवलंबला. रोहन बिरु सोनटक्के (21) असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून तब्बल 13 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकसत्ताने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. (Mumbai: मोबाईल चोरी पकडल्याने स्थानिकांकडून झालेल्या बेदम मारहाणीत 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; 6 जण पोलिसांच्या ताब्यात)
रोहन पत्नीला खुश ठेवण्यासाटी पुण्यातील दुकानांमधून साड्या आणि ड्रेस चोरी करायचा. याशिवाय तो मोबाईल, लॅपटॉप आणि गाड्यांची देखील चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 18 मोबाईल, 3 लॅपटॉप, 30 साड्या, 12 ड्रेस आणि किराणा माल जप्त केला आहे.
गुन्हेगार रोहन सोनटक्के ॲमनोरा मॉलच्या मागे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिस चौकशी दरम्यान, त्याने पुण्यातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी करत असल्याची कबुली दिली. त्याचबरोबर नवीन लग्न झाल्याने पत्नीला खुश ठेवण्यासाठी चोरी करत असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, त्याच्यावरील तब्बल 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे रोहन हा साधासुधा चोर नसून सराईत गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे. (Nashik Murder: खळबळजनक! चोरीचा गुन्हा लपवण्यासाठी एका तरूणाने केली 9 वर्षांच्या मुलाची हत्या; नाशिक येथील घटना)
यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बायकोला किंवा गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी दागिने, मोबाईल किंवा किंमत ऐवज चोरी करणारे अनेकजण गजागाड गेले आहेत.