Pune Fraud: पोलीस असल्याचे सांगत रिक्षाचालकाचा 10 हजारांचा स्मार्टफोन पळवला, एकास अटक

हे तोतया पोलिस मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना एकटे गाठून त्यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलिसांनी (Fake Police) धुमाकूळ घातला आहे. हे तोतया पोलिस मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना एकटे गाठून त्यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यातच पुण्यात (Pune) पोलीस असल्याचे सांगत एका व्यक्तीने रिक्षाचालकाचा दहा हजारांचा मोबाईल पळवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, रिक्षाचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा चिंचवड गावातील रहिवाशी असल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. याचबरोबर अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावधान राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात फिर्यादी इरफान शेखने स्टॅंडवर रिक्षा उभी केली होती. त्यावेळी आरोपी सचिन सकाटे त्याच्याजवळ आला आणि पुण्यातील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जायचे सांगितले. त्यावेळी आरोपीने आपण पोलीस असल्याचे इरफानला सांगतिले. दरम्यान, वरिष्ठांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आरोपीने इरफानकडे स्मार्टफोन मागितला आणि वार्डमध्ये निघून गेला. परंतु, 15 मिनिटे उलटून गेले तरी, आरोपी बाहेर न आल्याने इरफान त्याला पाहण्यासाठी आणि आपला मोबाईल परत घेण्यासाठी वार्डमध्ये गेला. परंतु, तिथे गेल्यानंतर इरफानला मोठा धक्का बसला. आरोपी मोबाईल घेऊन गेलेल्या वार्डला दोन दरवाजे असल्याचे इनफान निदर्शनास आले. आपल्याला एका दारात वाट पाहायला लावून आरोपी दुसऱ्या दाराने पळून गेल्याचे इरफानच्या लक्षात आले. हे देखील वाचा- Madhya Pradesh Shocker: युवकाचा नदीत बुडून मृत्यू; गावकऱ्यांनी झाडाला उलटे लटकावला मृतदेह, समोर आले धक्कादायक कारण

त्यानंतर इरफानने आपल्यासोबत घडलेला सर्वप्रकार स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला. इरफानने दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहे. तसेच याआधी त्याने आणखी किती लोकांना फसवले आहे, याचाही तपास केला जात आहे.