Pune: जेवणात भाकरी मिळाली नाही म्हणून मद्यधुंद महिलेचा हॉटेलमध्ये राडा, पोलिसांवरही हात उगारला
तेथे जेवणात भाकरी मिळाली नाही, या कारणाने महिलेने दारुच्या नशेत हॉटेलमधील कामगार आणि मॅनेजर यांना शिवीगाळ करुन जोरजोरात आरडाओरडा सुरु केला.
पुण्यात एका मद्यधुंद महिलेने हॉटेलमध्ये राडा घालत त्यांना थांबवायला आलेल्या पोलीस महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेलमध्ये ही घटना घडली. तेथे जेवणात भाकरी मिळाली नाही, या कारणाने महिलेने दारुच्या नशेत हॉटेलमधील कामगार आणि मॅनेजर यांना शिवीगाळ करुन जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. तसेच, इतर ग्राहकांच्या जेवणात पाणी टाकून त्यांना त्रास दिला.या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून केदारी नगर (वानवडी) येथील कुणाल टेरेस येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 एप्रिलला रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडला.
या घटनेची माहिती हॉटेल मॅनेजरने जवळच असलेल्या पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक श्री सागर हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी महिलेची समजूत काढून, तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेच्या वर्दीवरील नेमप्लेट बघून " मी कोण आहे ते तुला दाखवतेच" असे बोलून त्यांची नेमप्लेट जोरात ओढली आणि शिवीगाळ केली. यानंतर त्यांनी या महिला पोलिसांवर हात देखील उगारला. यात महिला पोलिस नाईक जखमी झाल्या. मार्केट यार्ड पोलिस याचा तपास करत आहेत.
सदर घटनेनंतर महिलेविरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्थानक या प्रकरणांचा पुढील तपास करत आहे.