Pune Dahi Handi 2026: दहीहंडीनंतर मंडप उतरवताना लोखंडी रॉड डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवी भागात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर मंडप उतरवताना लोखंडी रॉड डोक्यात पडून 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला असून पोलिसांनी स्वतःहून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Dead Body | Pixabay.com

देशभर आज 5 सप्टेंबर दिवशी दहीहंडीचा (Dahi Handi) उत्साह असताना पुण्यातील एका अपघाताने या सणाच्या आनंदाला गालबोट लागलं आहे. पुण्यातील जुन्या सांगवी (Sangvi) भागात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढताना घडलेल्या एका भीषण अपघातात सलमा सलाउद्दीन पठाण या 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत असताना त्याचा एक अवजड भाग अचानक खाली उभ्या असलेल्या सलमा यांच्या डोक्यात पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सलमा यांचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

सांगवी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवीतील लेन नंबर २ येथील 'विघ्नहर्ता मित्र मंडळ' आणि 'विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ' यांची दहीहंडी रात्री साधारण दहाच्या दरम्यान फुटली. त्यानंतर सुमारे १० मिनिटांनी स्टेजचा मंडप उतरवण्याचे काम सुरू झाले. दहीहंडी बघण्यासाठी आलेल्या सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाउद्दीन पठाण घरी परतत असताना मंडपाची कमान उतरवली जात होती. त्याचवेळी त्या महिला जवळ आल्याने मंडपाचा लोखंडी रॉड त्यांच्या अंगावर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कोळी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी महिलेला उपचारासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. साउंड सिस्टीम कोसळल्याच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षात कोणतीही साउंड सिस्टीम पडलेली नव्हती, तर मंडपाची कमान उतरवताना लोखंडी रॉड खाली पडला होता.

कुटुंबीयांचा तक्रार नोंदवण्यास नकार

या दुर्घटनेत विशेष बाब म्हणजे मृत सलमा यांचा मुलगा रहीम पठाण हा स्वतः याच दहीहंडी मंडळात सदस्य आणि सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नातेवाईकांची भेट घेऊन तक्रार नोंदवण्याची विनंती केली, मात्र "हे आमचेच मंडळ आहे, सर्व मुले आमचीच आहेत आणि आमचा मुलगाही त्यात आहे" असे सांगत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली असून पुढील तपासानंतर आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement