IPL Auction 2025 Live

Pune Crime: पुण्यात संपत्तीच्या वादातून महिलेची आत्महत्या; नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

संपत्तीचा वादातून मामा आणि नातेवाईकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. आता अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुंदा असे महिलेचे नाव असून वडिलोपार्जित संपत्तीवरुन त्यांचे भावाशी वाद सुरू होते. (हेही वाचा - Visakhapatnam Shocker: 'सॉरी दीदी, मला जावे लागेल', लैंगिक अत्याचार पीडित विद्यार्थिनीची कॉलेज इमारतीवरून उडी घेत आत्महत्या)

कुंदा आदिनाथ ढुस (वय 56, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुंदा यांचा भाऊ संजय ठाणगे (वय 50), त्यांची पत्नी अनिता (वय 45), मुलगा ऋषीकेश (वय 28), मंदा रमेश कुऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदा यांची विवाहित मुलगी अनुपमा सुक्रे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  कुंदा यांना चार मुली असून, त्या विवाहित आहेत. वडिलोपार्जित संपत्तीवरुन त्यांचे भावाशी वाद सुरू होते. कुंदा काही दिवसांपूर्वी वाघोली परिसरात राहणाऱ्या विवाहित मुलीकडे आल्या होत्या. मुलीच्या घरी त्यांनी पंख्याला स्कार्फ बांधून नुकतीच आत्महत्या केली.

संपत्तीचा वादातून मामा आणि नातेवाईकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी सांगितले.