पुणे: बिल्डर राजेश कानाबार यांच्यावर भर दिवसा गोळीबार; पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार!
दरम्यान गोळीबारामध्ये 63 वर्षीय राजेश कानाबर यांंचा मृत्यू झाला.
आज (5 ऑक्टोबर) पुणे (Pune) शहर दोन खूनांच्या बातम्यांनी हादरले आहे. सकाळी खराडी परिसरात कुख्यात गुंड शैलेश घाडगे याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्यानंतर आता दुपारी 3 च्या सुमारास बिल्डर म्हणजेच बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर भर दिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या काही तासांत 2 खूनाच्या घटना समोर आल्याने आता पुण्यातील कायदा आणि सुरक्षेबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. दरम्यान गोळीबाराची घटना ही पुणे पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या चौकात, ट्रेजरी कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. दरम्यान गोळीबारामध्ये 63 वर्षीय राजेश कानाबर (Rajesh Kanabar) जबर जखमी झाले. त्यांच्यावर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
आज दुपारी 3 च्या सुमारास दुचाकीवरून तरूण आले. त्यांनी राजेश कानाबर यांच्यावर गोळीबार केला. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल असून पुणे मनपा वाहतूक विभागाकडून हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागात अनेक प्रशासकीय कार्यालयं आहेत. Pune Crime: पुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंड शैलेश घाडगे याची दगडाने ठेचून हत्या.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, राजेश कानाबार यांचे जागेचे काही वाद होते. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आज त्यांच्या प्रकरणात सुनावणीदेखील होती. दुपारी त्याच निमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून परतताना राजेश फूटपाथवर उभे होते. मागून 2 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी दिवसाढवळ्या राजेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या बंडगार्डन पोलिस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून ते याबाबत पुरावा शोधण्याचा आणि अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.