Pune: लोकप्रिय नृत्यांगना विशाखा काळे हिची गळफास घेऊन आत्महत्या; Coronavirus मुळे कार्यक्रम बंद, उत्पन्नाचे साधन नसल्याने आले होते नैराश्य
अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसला आहे, यामध्ये मनोरंजन क्षेत्राचे थोडे जास्तच नुकसान झाले आहे. या काळात आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागल्याने काही लोकांनी आपले जीवन संपण्याचा मार्ग अवलंबला.
सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात गेले सहा महिने देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसला आहे, यामध्ये मनोरंजन क्षेत्राचे थोडे जास्तच नुकसान झाले आहे. या काळात आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागल्याने काही लोकांनी आपले जीवन संपण्याचा मार्ग अवलंबला. आता 22 वर्षीय नृत्य कलाकार विशाखा काळे (Vishakha Kale) हिने आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून, राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. काल, मंगळवारी ही दुःखद घटना घडली. घरची हालाखीची परिस्थिती व पुढे उत्पन्नाचा मार्ग दिसत नसल्याने विशाखा काही महिन्यांपासून नैराश्येमध्ये होती.
विशाखाच्या पश्चात दिव्यांग आई-वडील तसेच लहान बहीण नृत्य कलाकार प्रियांका काळे असा परिवार आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या विशाखा व प्रियांका या सांस्कृतिक कार्यक्रम करत होत्या. कोरोनाच्या काळात हे कार्यक्रम बंद झाले, त्यामुळे उत्पन्नाचे साधनही बंद झाले. यानंतर विशाखाचे नैराश्य अजूनच वाढले. शेवटी तिने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी तिचे आई-वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. (हेही वाचा: अकोला: सूवर्णपदक विजेता बॉक्सरपटू प्रणव राऊत याची गळफास घेऊन आत्महत्या)
याबाबत बोलताना प्रियांकाने सांगितले की, ‘1 वर्षापूर्वी विशाखाचा अपघात झाल्याने तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 1 लाख खर्च आला. त्यानंतर कोरोना काळात दोघींनाही कार्यक्रम मिळणे बंद झाले व पुढे घर कसे चालवायचे याचीच चिंता विशाखाला सतावत होती.’ महाराष्ट्राची गौरव गाथा, गर्जा हा महाराष्ट्र, महाराष्ट्राची लोकधारा अशा कार्यक्रमांमध्ये दोघी बहिणींनी काम केले होते. दरम्यान, फक्त मनोरंजन क्षेत्रच नाहीत, तर हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीलाही कोरोनाचा फार मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील काही व्यक्तींनीही हलाखीच्या परिस्थितीमुले आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे.