Pune Airport Terminal : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन

मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच उद्घाटन 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन पार पडेल.

Pune Airport Terminal: पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन पार पडणार आहे. उद्घाटनानंतर 4 ते 6 आठवडे टर्मिनलवर सुरक्षा चाचण्या होतील. त्यानंतर, नव्या टर्मिनलवरून (Pune Airport Terminal) विमानांचं उड्डाण सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 475 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले होते. मात्र, उद्घाटन होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत होती. 10 मार्चला मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. (हेही वाचा :Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार हिरवा झेंडा)

त्याशिवाय वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण 12 हजार 700 कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 मार्चला दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल. नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जानेवारीमध्ये या टर्मिनलची पाहणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनीही पाहणी केली होती. काम पूर्ण होऊही उद्घाटन होत नसल्याने अनेक राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता तसेच आंदोनल केले होते. अखेर या टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे. (हेही वाचा :Pune Flights Disrupted: दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे पुण्यातील 11 उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसौय)

कसे आहे नवीन टर्मिनल?

एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर

तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार

वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख

वाहनतळ क्षमता : 1 हजार मोटारी

प्रवासी लिफ्ट : 15

सरकते जिने : 8

चेक-इन काऊंटर : 34

एकूण खर्च – 475 कोटी रुपये

काल पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या मार्गीकेला हिरवा झेंडा दाखवला. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका काल सुरु झाली. काही दिवसांपासून विमानतळ कधी सुरु होणार?, यासंदर्भात चर्चा सुरु होती. त्यानंतर आता लगेच विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला आहे. काहीच आठवड्यात हे विमानतळ पुणेकरांसाठी खुलं होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement