पुणे: अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कारला सासवड येथील हिवरे गावात अपघात

कारमध्ये असलेल्या प्रवीण तरडे, विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी यांना विशेष दुखापत झाली नाही. कारला असलेल्या एअर बॅगमुळे त्यांचा बचाव झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Actor, director Pravin Tarde l (Photo Credits: Facebook)

अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या कारला अपघात घडला आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पुणे (Pune) जिल्ह्यातील सासवड (Saswad) येथील हिवरे गावात (Hiware Village) ही घटना मंगळवारी (27 ऑगस्ट 2019) रात्री आकरा वाजनेच्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा प्रवीण तरडे यांच्यासोबत अभिनेते रमेश परदेशी आणि निर्माते विशाल चांदणे हे एकाच कारने प्रवास करत होते. दरम्यान, हिवरे गवातील महादेव मंदिरासमोर त्यांच्या कारला अपघात घडला.

अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये असलेल्या प्रवीण तरडे, विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी यांना विशेष दुखापत झाली नाही. कारला असलेल्या एअर बॅगमुळे त्यांचा बचाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर काही काळ अफवा पसरल्या त्यात प्रवीण तरडे आणि कारमधील इतर मंडळींबाबत उलटसुलट दावे केले जात होते. मात्र, सासवड पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आणि वास्तव जाणून घेतले. त्यानंतर तरडे, परदेशी आणि चांदणे हे सुखरुप असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं.

अभिनेता प्रवीण तरडे लिखीत आणि दिग्दर्शीत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. प्रवीण तरडे हे उत्तम अभिनेतेही आहेत. त्यांचे फँड्री, अजिंक्य, देऊळ बंद, लग्न मुबारक हे चित्रपट विशेष गाजले. ‘आरारारा… खतरनाक’ या आपल्या खास स्टाईलसाठी आपल्या चाहत्यांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. (हेही वाचा, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले)

दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या वाहनालाही काल (मंगळवार, 27 ऑगस्ट 2019) अपघात घडला होता. ते मुंबईहून सांगोल्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाला इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागला. मात्र, सध्या त्यांची प्रकृती सुरक्षीत आहे. या अपघातातून ते बालबाल बचावले. अपघातात त्यांच्या वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले.