Public Transpor on Atal Setu: उद्यापासून मुंबईच्या अटल सेतूवर बेस्ट बस क्रमांक एस-145 सुरु; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि दर
17,840 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला हा अटल सेतू मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात महत्त्वाचा मानला जातो.
Public Transpor on Atal Setu: दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणा-या अटल सेतू- मुंबई ट्रान्स हार्बरचे (Atal Setu- Mumbai Trans Harbour) मार्गे सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यानंतर, या मार्गावरून बेस्ट उपक्रमातर्फे प्रवासी बस वाहतूक सुरू करण्याबाबत प्रवाशांकडून सातत्याने मागणी उपक्रमाकडे होत होती. त्याअनुषंगाने बेस्ट उपक्रमातर्फे जागतिक व्यापार केंद्र आणि कोकणभवन, सीबीडी बेलापूर दरम्यान ऍपवर आधारित वातानुकूलित प्रिमियम बससेवा बसमार्ग क्र. एस- 145 गुरुवार 14 मार्च 2024 पासून कार्यान्वित करण्यात येत आहे. या बसमार्गावर सकाळी सीबीडी बेलापूर येथून आणि संध्याकाळी जागतिक व्यापार केंद्र येथून बसफेऱ्या प्रवर्तित करण्यात येतील.
प्रवासमार्ग- जागतिक व्यापार केन्द्र - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केन्द्र (मंत्रालय) - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ) - पूर्व मुक्त मार्ग - अटल सेतू (उड्डाणपूल) - उलवे नोड - किल्ले गावठाण - बामणडोंगरी रेल्वे स्थानक - कोकण भवन सीबीडी बेलापूर.
प्रस्थानस्थान -
अ) कोकण भवन सीबीडी बेलापूर
ब) जागतिक भवन सीबीडी बेलापूर
बसफेऱ्यांच्या वेळा
सकाळी 7.30, 8 वाजता
सायंकाळी 5.30, 6 वाजता
प्रवासभाडे- जागतिक व्यापार केंद्र ते कोकण भवन सीबीडी बेलापूर मार्गावरील दर 225 रुपये असेल.
किमानभाडे- 50 रुपये, कमाल भाडे- 225 रुपये
प्रवर्तन कालावधी- या बसमार्गावरील बसगाडया सोमवार ते शनिवार कार्यान्वित राहतील.
तरी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे प्रवाशांना करण्यात येत आहे. (हेही वाचा: Nandurbar Bus Fire : नंदुरबारमध्ये एसटी बसने घेतला पेट; प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ)
दरम्यान, अटल सेतूच्या मदतीने प्रवाशांना नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. 17,840 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला हा अटल सेतू मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात महत्त्वाचा मानला जातो. अटल सेतूवर सुरू होणारा नवीन बस मार्ग S-145, चलो ॲपशी जोडला जात आहे. अटल सेतूवर सुरू होणारी ही सेवा वाहतुकीने गजबजलेल्या मुंबईतील प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.