Promising Location for Jobs: दुसऱ्या तिमाहीमध्ये नोकरभरतीसाठी मुंबई हे तिसरे आशादायक शहर; बंगळुरू अव्वल- TeamLease Services

त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. टीमलीज सर्व्हिसेसचा हा अहवाल देशातील 23 सेक्टर आणि 12 शहरांमधील 865 कंपन्यांवर आधारीत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोनादरम्यानच्या दोन वर्षांच्या मंदीनंतर आता भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) पुन्हा बळकटी प्राप्त करत आहे. आता भारतातील कंपन्या सप्टेंबरच्या तिमाहीत अधिक नोकर भरती करण्याची शक्यता आहे. आयटी, ई-कॉमर्स, एफएमसीजी (FMCG) आणि संबंधित क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे हे शक्य होईल. यामध्ये देशातील इतर शहरांच्या तुलनेत बंगळुरूमध्ये अधिक भरतीची शकयता आहे. मानव संसाधन कंपनी टीमलीज सर्व्हिसेसच्या एम्प्लॉयमेंट आउटलुक अहवालानुसार (TeamLease Employment Outlook Report), 61 टक्के भारतीय कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत लोकांना कामावर घेण्याचा त्यांचा इरादा व्यक्त केला, जो मागील तिमाहीपेक्षा 7 टक्के अधिक आहे.

अहवालानुसार, 95 टक्के कंपन्यांनी नव्या नोकर भरतीचा इरादा व्यक्त केला, जो एप्रिल ते जून या कालावधीत 91 टक्के होता. विशेष बाब म्हणजे बंगळुरूमधील उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांत नोकरभरतीच्या उद्देशाने सकारात्मक वाढ दिसून आली. एफएमसीजी उद्योग उत्पादन क्षेत्रात आघाडीवर होता, त्यानंतर हेल्थकेअर आणि फार्मा उद्योग, अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा, पॉवर आणि एनर्जी आणि कृषी आणि कृषी रसायन उद्योग येतो.

सेवा क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, आयटी उद्योग आघाडीवर होता, ज्यामध्ये इतरांपेक्षा नोकरभरतीचा हेतू अधिक दिसून आला. IT नंतर, ई-कॉमर्स आणि संबंधित स्टार्ट-अप, शैक्षणिक सेवा, दूरसंचार, रिटेल आणि वित्तीय सेवा उद्योगांचा क्रमांक येतो. टीमलीज सर्व्हिसेसचे सीबीओ महेश भट्ट म्हणतात की, बंगळुरूमध्ये गेल्या दशकात प्रचंड उद्योग वाढ झाली आहे. विशेषत: इंटरनेटवर आधारित नवीन युगातील कंपन्यांच्या आगमनाने उद्योग वाढीला भरपूर पाठिंबा मिळाला आहे.

ते पुढे म्हणाले की, येत्या तिमाहीत नोकरभरतीच्या शक्यतांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. अहवालानुसार, बेंगळुरू व्यतिरिक्त, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्येही नव्या नियुक्तीचा हेतू दिसून आला. या शहरांमध्येही आयटी, विक्री, अभियांत्रिकी आणि विपणनाची मागणी वाढली आहे. अशाप्रकारे दुसऱ्या तिमाहीमध्ये नोकरभरतीच्या उच्च इराद्यासह मुंबई शहर तिसरे सर्वात आशादायक शहर म्हणून उदयास आले आहे. 23 क्षेत्रांपैकी, बहुतांश क्षेत्रांनी मुंबईत लोकांना नोकरी देण्याचा सकारात्मक हेतू दर्शविला आहे. (हेही वाचा: पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही करणार गुंतवणूक, वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे विधान)

मात्र, क्षेत्राचा विचार करता सेवा क्षेत्रात बंगळुरू शहर अव्वल आहे. त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. टीमलीज सर्व्हिसेसचा हा अहवाल देशातील 23 सेक्टर आणि 12 शहरांमधील 865 कंपन्यांवर आधारीत आहे. या अहवालात जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत नव्या नियुक्तीचा हेतू कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.