मराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री
या बैठकीत गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही, केसरकर यांनी दिली
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) मिळावे म्हणून राज्यात फार मोठे आंदोलन घडले होते. एका आंदोलनानंतर सरकार मागण्या मान्य करत नाही म्हणून दुसरे आंदोलन. अशा विविध आंदोलनांमध्ये ज्या काही हिंसा घडल्या त्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेतले जाण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी (CM) दिले होते, त्यानुसार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असे राज्यगृहमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले आहे.
मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि दीपक केसरकर यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चादरम्यान जी हिंसा उफाळली होती त्यामध्ये पोलिसांवरही हल्ले झाले होते. त्यावेळी पोलिसांनी मराठा समाजाच्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले होते.
(हेही वाचा: Bhima Koregaon, Maratha Morcha : गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील; देवेंद्र फडणवीस)
मात्र त्यानंतर हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मोर्चेकारांनी केली होती, त्यानुसार काही गुन्हे मागे घेतले जातील अशी माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. आता लवकरच ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलीस महांचालकांकडून प्राप्त झालेला अहवाल, विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यावरचा अभिप्राय प्राप्त झाला की, ही प्रक्रिया सुरु होईल. यासाठी साधारण 8 ते 10 दिवस लागण्याची शक्यता आहे.