Private Buses Found Violating Rules: राज्यात प्रवाशांच्या जीवाला धोका? तब्बल 4,277 खाजगी बसेस नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या

या मोहिमेदरम्यान आढळून आले की, 40 बसेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्धारित केलेल्या भाडे नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारात होत्या.

Private Buses (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता खासगी बसेसबाबत (Private Buses) एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्य परिवहन विभागाने खासगी बसचालकांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रात 4,277 बस नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या. यापैकी 514 बसेस योग्य अग्निशमन यंत्रणेशिवाय धावत असल्याचे आढळून आले आणि 890  चालक योग्य परवान्याशिवाय वाहन चालवताना किंवा परवान्यांच्या अटींचे उल्लंघन करताना आढळून आले. एकूण 183 लाख रुपयांचा दंड या गुन्हेगारांवर लावण्यात आला.

साधारण 16 मे ते 30 जून दरम्यान 45 दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात 14,161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सर्वात चिंतेची बाब म्हणजे बसेस योग्य अग्निशमन यंत्रणेशिवाय धावत होत्या, प्रवाशांना धोका निर्माण करत होत्या आणि चालक आवश्यक परवान्याशिवाय किंवा परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून वाहने चालवत होते, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षेची गंभीर चिंता अधोरेखित झाली.’

सर्वसमावेशक तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांना इतर अनेक उल्लंघने देखील आढळून आली. सर्वात सामान्य उल्लंघनांमध्ये रिफ्लेक्टर्स, इंडिकेटर्स, टेल लाइट्स आणि वाइपरची अनुपस्थिती समाविष्ट आहे. तब्बल 1,702 बसेसमध्ये या आवश्यक सुरक्षा फीचर्सचा अभाव आहे. शिवाय, 570 खाजगी बस वैध कागदपत्रांशिवाय धावत असल्याचे आढळून आल्या.

पुढील तपासात असे दिसून आले की 485 बसेसचे वाहन कर भरले नव्हते, जे संभाव्य आर्थिक दायित्वांकडे दुर्लक्ष दर्शविते. धक्कादायक म्हणजे, 293 बसेसना आपत्कालीन दरवाजे नसलेले आढळले, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला. राज्य परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर जोर देऊन बेकायदेशीरपणे मालाची वाहतूक करताना आढळलेल्या 227 खाजगी बस चालकांवर कठोर कारवाई केली. (हेही वाचा: Nashik Chauafali Road Accident: नाशिक येथील चौफळी मार्गावर अपघात, भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुलकल्याने गमवले प्राण)

याशिवाय, 147 बसेस जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या, परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या आणि प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या आढळल्या. या मोहिमेदरम्यान आढळून आले की, 40 बसेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्धारित केलेल्या भाडे नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारात होत्या.